Finally, the bugle has sounded for the Zilla Parishad elections : ... अखेर महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले; आचारसंहिता लागू!
येत्या ५ फेब्रुवारीला मतदान तर, ७ फेब्रुवारीला मतमोजणी : येत्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १३ जानेवारी २०२६ :- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल केवळ एक, दोन नव्हे तर, तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर अखेर मंगळवारी (दि.१३ जानेवारी) वाजला आहे. यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी येत्या दि. ५ फेब्रुवारीला मतदान तर, मतमोजणी दि. ७ फेब्रुवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना या निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेसह राज्यातील बारा जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणुकीची अधिसूचना येत्या शुक्रवारी (दि.१६ जानेवारी) प्रसिद्ध केली जाणार असून, याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे पुणे जिल्हा परिषदेला आणि पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांना तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर अनुक्रमे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाळ दि. १३ मार्च २०२२ तर, पुणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ दि. २० मार्च २०२२ रोजी संपुष्टात आलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.
राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका मागील अनेक वर्षांपासून लटकल्या आहेत. यापैकी आता केवळ १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदा २११ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका याराखीव सदस्य संख्येची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे वादात अडकून पडल्या आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम
- निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी --- दि. १६ जानेवारी २०२६.
- उमेदवारी अर्ज दाखल करणे --- दि.१६ ते २१ जानेवारी २०२६.
- उमेदवारी अर्जांची छाननी ---- दि. २२ जानेवारी २०२६.
- उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत --- दि.२७ जानेवारी २०२६. (दुपारी ३ वाजेपर्यंत).
- उमेदवारांची अंतिम यादी व निवडणूक चिन्ह वाटप --- दि. २७ जानेवारी २०२६. (दुपारी साडेतीन वाजल्यानंतर).
- मतदान --- दि. ५ फेब्रुवारी २०२६ ( सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत).
- मतमोजणी व निकाल --- दि. ७ फेब्रुवारी २०२६.
निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदा
- पुणे
- कोल्हापूर
- सांगली
- सातारा
- सोलापूर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- छत्रपती संभाजीनगर
- परभणी
- धाराशिव
- लातूर.
