Zilla Parishad election 2026 : कार्यकर्त्यांनो कामाला लागा, राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मंगळवारी दुपारी ४ वाजता बिगुल वाजणार? 

राज्य निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यात पुणे झेडपीचा समावेश 

Zilla Parishad election 2026 : कार्यकर्त्यांनो कामाला लागा, राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा मंगळवारी दुपारी  ४ वाजता बिगुल वाजणार? 
पुणे:- महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकींची घोषणा होणार.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि‌. १३ जानेवारी २०२६ :- ... अखेर राज्य निवडणूक आयोगाला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मुहूर्त सापडला आहे. यानुसार यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी (दि‌. १३ जानेवारी) दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत पुणे जिल्हा परिषदेसह महाराष्ट्रातील १२  जिल्हा परिषदांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका पूर्ण करण्यासाठी सोमवारी (दि.१२ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीनुसार येत्या दि. १५ फेब्रुवारीपुर्वी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे राज्य निवडणूक आयोगावर बंधनकारक आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिल्यानंतर सोमवारपासूनच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागला होता. यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची पुर्वतयारी करण्याचा आणि यासाठी पंचायत समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. 

दरम्यान, मंगळवारी दुपारी चार वाजता महाराष्ट्रातील पुणे जिल्हा परिषदेसह १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तर, तहसीलदार संवर्गातील अधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

निवडणूक जाहीर होणाऱ्या जिल्हा परिषदा 

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या बारा जिल्हा परिषदांमध्ये पुणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर आदींचा समावेश आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये १२५ पंचायत समित्यांचा समावेश आहे. या सर्व पंचायत समित्यांची निवडणूक घेतली जाणार आहे.