Zilla Parishad election Preparation Order : राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग लागला कामाला!

जिल्हा परिषद निवडणुकीची पुर्वतयारी करण्याचा आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा राज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Zilla Parishad election Preparation Order : राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग लागला कामाला!

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि‌. १२ जानेवारी २०२६ :- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग सोमवारपासून (दि.१२ जानेवारी) जिल्हा परिषद निवडणुकीच्या कामाला लागला आहे. यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीची पुर्वतयारी करण्याचा आणि यासाठी पंचायत समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. 

या आदेशामुळे महाराष्ट्रातील पुणे जिल्हा परिषदेसह १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे‌.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तर, तहसीलदार संवर्गातील अधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहेत.

निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदा 

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या जिल्हा परिषदांमध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर आदींचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये असलेल्या सर्वच्या सर्व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेतली जाणार आहे. 

​दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा कोणत्या? 

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. यामध्ये ठाणे, नंदुरबार,  पालघर, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, नाशिक अहिल्यानगर,जालना, बीड, धुळे आणि जळगाव आदींचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांची निवडणूक होणार 

दरम्यान, पहिल्या टप्प्यात केवळ सदस्य संख्येच्या राखीव जागांची संख्या ५० टक्क्यांच्या आत असलेल्याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यातील या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १३ पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे.