In the Pune Zilla Parishad, political activists are intimidating ordinary contractors to manipulate the tendering process : पुणे झेडपीत टेंडर 'रिंग'' करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची सामान्य ठेकेदारांना 'दमबाजी'! 

टेंडर मागे घेण्यासाठी दबाव, अधिकाऱ्यांच्या सहभागाचा आरोप : धमक्या अन् दबावामुळे त्रस्त ठेकेदाराची 'सीईओं'कडे लेखी तक्रार

In the Pune Zilla Parishad, political activists are intimidating ordinary contractors to manipulate the tendering process : पुणे झेडपीत टेंडर 'रिंग'' करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांची सामान्य ठेकेदारांना 'दमबाजी'! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १२ डिसेंबर २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेतील अनेक विभागांमध्ये विविध विकासकामांच्या निविदा मागे घेण्यासाठी म्हणजेच टेंडर 'रिंग'' करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य ठेकेदारांना 'दमबाजी' करण्यात येऊ लागली आहे. संबंधित ठेकेदाराने भरलेले टेंडर मागे घेतले की, आपला टेंडर मिळण्याचा मार्ग मोकळा, या उद्देशाने जाणीवपूर्वक ही दमबाजी केली जात आहे.

विशेष म्हणजे या राजकीय कार्यकर्त्यांच्या या 'दमबाजी'त जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. टेंडर रिंग करण्यासाठी मिळत असलेल्या धमक्या आणि दबावामुळे त्रस्त झालेल्या एका एका सामान्य ठेकेदाराने याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)गजानन पाटील यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. टेंडर रिंग करण्यासाठी ठेकेदारांवर दबाव टाकण्यात चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यांचाच सहभाग असल्यामुळे जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, जिल्हा परिषदेतील निविदा प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप आणि टेंडर रिंग करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांकडून केली जाणारी दमबाजी थांबविण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत आणि याप्रकरणी सहभागी असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांच्या निविदा प्रक्रियेमध्ये राजकीय कार्यकत्यांचा हस्तक्षेप वाढला असून सर्वसामान्य कंत्राटदाराने ऑनलाइन निविदा प्रक्रियेमधून निविदा भरल्यास त्याच्यावर दबाव आणून माघार घेण्यास भाग पाडले जात आहे. यामध्ये संबंधित कार्यकारी अभियंता व निविदा लिपिकांचाही सहभाग असून जिल्हा परिषदेतूनच गोपनीय माहिती संबंधित राजकीय व्यक्तींना पुरविण्यात येत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. राजकीय कार्यकर्ते हे काही  मुठभर ठेकेदारांना हाताशी धरून, त्यांच्याशी संबंधित कामात भागीदारी करून अन्य ठेकेदारांवर निविदा प्रक्रियेमधून माघार घेण्यास भाग पाडतात आणि निविदा पदरात पाडून घेतात. तरी यामध्ये आपण गांभीर्याने लक्ष घालावे आणि  पात्र निविदा त्वरित उघडून सामान्य ठेकेदारांना न्याय द्यावा,अशीही मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. 

'आत्महत्येला भाग पाडू नका' 

राजकीय कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे सामान्य ठेकेदारांना इच्छा नसतानाही जिल्हा परिषदेच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेमधून नाईलाजाने माघार घ्यावी लागत आहे. हा प्रकार नेहमीचाच झाल्याने, आमचे जगणे मुश्कील झाले आहे. मुळात हाताला रोजगार नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी छोटी-मोठी विकासकामे मिळावीत, या अपेक्षेने आम्ही निविदा प्रक्रियेत सहभागी होत आहोत. त्यातच धमक्या आणि दबावामुळे आम्ही त्रस्त झालो आहोत. त्यामुळे यात वेळीच लक्ष घाला. अन्यथा आमच्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे यात लक्ष घालून न्याय द्या आणि आत्महत्येला भाग पाडू नका, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 

सामान्य ठेकेदाराने झेडपी 'सिईओं' कडे केलेली तक्रार जशीच्या तशी पुढीलप्रमाणे 

प्रति,

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद, पुणे.

विषय:-  निविदा प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपाबाबत. 

महोदय,

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांच्या निविदा प्रक्रियेमध्ये राजकीय कार्यकत्यांचा हस्तक्षेप वाढला असून सर्वसामान्य कंत्राटदाराने ऑनलाइन निविदा प्रक्रियेमधून निविदा भरल्यास त्याच्यावर दबाव आणून माघार घेण्यास भाग पाडले जात आहे. यामध्ये संबंधित कार्यकारी अभियंता व निविदा लिपिक यांचा पण सहभाग असून ते गोपनीय माहिती संबंधित राजकीय व्यक्तींना पुरवत आहेत.

राजकीय कार्यकर्ते मुठभर ठेकेदारांना हाताशी धरून त्यांच्याशी कामात भागीदारी करून इतर ठेकेदारांना माघार घेण्यास भाग पाडतात व निविदा पदरात पाडून घेतात. तरी आपण याविषयी गांभीर्याने लक्ष देऊन पात्र निविदा त्वरित ओपन कराव्यात‌. अन्यथा आमच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, याची नोंद घ्यावी, ही नम्र विनंती. 

आपला विश्वासू 

एक त्रस्त कंत्राटदार


टेंडर 'रिंग' करणे म्हणजे काय? 

काही ठराविक कंत्राटदार संगनमत करून किंवा अन्य सामान्य ठेकेदारांना निविदा प्रक्रियेमधून माघार घेण्यास जाणीवपूर्वक भाग पाडतात. जेणेकरून संबंधित ठेकेदाराला हवे ते काम मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणजेच निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक गैरव्यवहार केला जातो. यामध्ये मग ते कमी बोली लावण्याऐवजी जादा दराने बोली लावतात किंवा काम वाटून घेतात, ज्यामुळे सरकारी व सार्वजनिक कामांचा खर्च वाढतो आणि स्पर्धा संपते. यालाच 'निविदा रिंग' किंवा 'क्लब टेंडरिंग' म्हणतात. येथे  नियमांनुसार स्पर्धा होत नाही. 

हे कसे घडते?

यासाठी एकत्रित निविदा (Clubbing/Ring Tender) प्रक्रिया केली जाते. यानुसार अनेक लहान कामांची एकत्रितपणे एकच मोठी निविदा काढली जाते. ज्यामुळे छोट्या कंत्राटदारांना बोली लावणे शक्य होत नाही. यामध्ये कंत्राटदारांची मिलीभगत असते. यामुळे ठराविक कंत्राटदार एकत्र येऊन एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. ते ठरवून जास्त दराने निविदा भरतात, जेणेकरून प्रत्येकाला काम मिळेल आणि त्यांना जास्त फायदा होईल, ही यामागची भूमिका असते.