पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार बनले झेडपी शाळेतील चिमुकल्यांचे पालक!
खेड तालुक्यातील निघोजेत निभावली पालकाची भूमिका : चिमुकल्यांना बोट धरून सोडले शाळेत

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ जून २०२५ :- स्थळ जिल्हा परिषद शाळा, निघोजे. वार सोमवार. वेळ सकाळची.शाळेचा पहिलाच दिवस. शिक्षक व पालकांची शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्याची धांदल आणि अशातच चक्क सुट-बुटातील एक व्यक्ती ही शाळेत येत असलेल्या चिमुकल्यांच्या चक्क बोटाला धरून त्यांना शाळेत सोडत होती. काळ्या रंगाचा सूट, पायात पॉलीश केलेले काळे चकचकीत बूट आणि डोळ्यावर चष्मा घातलेला असा पालक आपल्या शाळेत कसा, असा प्रश्न क्षणभर अनेकांना पडला. यामुळे निघोजेसारख्या ग्रामीण भागात एवढा उच्चशिक्षित, उच्चभ्रू आणि अधिकाऱ्यांसारखा शिस्तबद्ध पालक कोण, याचीच उत्सुकता ताणली गेली. पण नंतर हे पालक म्हणजे दुसरे -तिसरे कोणी नसून ते चक्क पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे असल्याचे स्पष्ट झाले आणि अनेकांच्या शंकांचे लगेच निरसन झाले. पण हे सर्व घडले ते झेडपी शाळेचेच माजी विद्यार्थी असलेले विभागीय आयुक्तांनी चक्क पालकांचीच भूमिका निभावल्याचे. निमित्त होते शाळा प्रवेशोत्सवाचे.
खेड तालुक्यातील निघोजे येथील शाळेत सुरुवातीला चिमुकल्यांचे पालक बनलेले विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे आदींच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सवात मुलांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. चिमुकल्यांना खाऊ, फुगे व फुले देत आनंददायी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, यावेळी डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गांचे उद्घाटन करण्यात आले.सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) बांधण्यात आलेल्या किचनशेडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पुलकुंडवार म्हणाले, "राज्य सरकारमधील अनेक अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेतलेले आहेत. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत न्यूनगंड बाळगू नये. याऊलट आपापल्या आपल्यांचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतला पाहिजे.निघोजे शाळेची एकूण पटसंख्या ८३६ असून, यापुढे मुलींना नववी व दहावीच्या शिक्षणासाठी गावाबाहेर जाण्याची गरज भासणार नाही."
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी शाळा सुरू होण्याच्या पूर्वसंध्येलाच पुणे जिल्ह्यातील निघोजे, गलांडवाडी व धानोरे या तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे.राज्यात प्रथमच अशी घटना घडली असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये माध्यमिक शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यात मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. भविष्यात निघोजे येथे व्यावसायिक शिक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, सरपंच सौ. सुनीता येळवंडे आदींसह शिक्षक, पालक उपस्थित होते.
नववीचास वर्ग सुरू
निघोजे शाळेत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता नववीचा वर्ग सुरू करण्यात आला असून पुढील वर्षीपासून दहावीचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. यामुळे यापुढे मुलींना नववी व दहावीच्या शिक्षणासाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. सोमवारी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नववीचा वर्ग सुरू करण्यात आला.