Zp school Head master & Graduate teaches promotion : ... आता पदवीधर शिक्षक अन् मुख्याध्यापकांनाच मिळणार केंद्रप्रमुखपदी पदोन्नती, उर्वरित शिक्षकांची परीक्षेद्वारे होणार निवड! 

ग्रामविकास खात्याकडून १९६७ च्याजिल्हा परिषद सेवा प्रवेश नियमात सुधारणा : पदोन्नती आणि थेट निवडीसाठी प्रत्येकी ५० टक्के कोटा जाहीर

Zp school Head master & Graduate teaches promotion : ... आता पदवीधर शिक्षक अन् मुख्याध्यापकांनाच मिळणार केंद्रप्रमुखपदी पदोन्नती, उर्वरित शिक्षकांची परीक्षेद्वारे होणार निवड! 
पुणे:- जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुखांचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

डॉ. गजेंद्र बडे :  ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २७ जुलै २०२५ :- राज्याच्या ग्रामविकास खात्याने केंद्रप्रमुख पदांच्या भरतीसाठीच्या निकषांमध्ये मोठा बदल केला आहे. या नव्या बदलानुसार ५० टक्के जागा या परीक्षेद्वारे तर, उर्वरित ५० टक्के जागा या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. यापुढे या पदोन्नतीसाठी फक्त पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक हेच पात्र असणार आहेत.जे पदोन्नतीसाठी पात्र नाहीत, अशा सर्वांना आता केंद्रप्रमुख होण्लेयासाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी ग्रामविकास खात्याने सन १९६७ च्या महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियमांमध्ये सुधारणा केली आहे. 

या सुधारणेमुळे नवे नियम हे  यापुढे ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम,२०२५’ म्हणून ओळखले जाणार आहेत. याअंतर्गत ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७’ या नियमाच्या परीशिष्ट ४ मधील भाग २ मध्ये अनुक्रमांक ८ मध्ये तशी नोंद करण्यात आली आहे.

नवीन सुधारणेनुसार केंद्रप्रमुख पदाची  शैक्षणिक अर्हता, अनुभव, सेवा आणि पदोन्नती आदी बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. यानुसार पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर किमान सहा वर्षे अखंड नियमित सेवा असणाऱ्या पदवीधर शिक्षकांमधून सेवा ज्येष्ठतेच्या आधारे केंद्रप्रमुखांची ५० टक्के पदे ही पदोन्नतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

याशिवाय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी निश्चित केलेल्या धोरणांचा आणि निवड परीक्षेच्या माध्यमातून उर्वरित ५० टक्के पदे भरण्यात येणार आहेत‌. केंद्रप्रमुख या पदावरील नियुक्तीसाठी आता यापुढे पदोन्नती आणि निवड परीक्षेचा अवलंब केला जाणार आहे. या दोन्ही पद्धतीने प्रत्येकी  ५० टक्के भरली जाणार आहेत.राज्याच्या ग्रामविकास खात्याने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रकाशित केला आहे.यामध्ये या सर्व बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.