Drug addiction : सावधान; पाचवी, सहावीचे विद्यार्थीही आता अंमली पदार्थांच्या विळख्यात!
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समुपदेशक डॉ. मिलिंद भोई : इंद्रायणी कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी घेतली अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी काम करण्याची शपथ
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ जुलै २०२५ :- अंमली पदार्थांच्या माध्यमातून आपल्या देशातील तरुण पिढीवर हल्ला करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, आता हे संकट आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत आले आहे. पूर्वी अंमली पदार्थांची सवय ही इयत्ता आठवीपासून पुढच्या मुलांमध्ये सुरू होत होती. पण दुर्दैवाने आता या पदार्थांनी अगदी पाचवी व सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा लक्ष्य केले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे आई-वडील, पालक आणि शिक्षकांनी यासाठी वेळीच सावध व्हायला हवे आणि अंमली पदार्थांच्या विळख्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळीच रोखावे, असे आवाहन अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समुपदेशक, महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे सदस्य आणि पुण्यातील भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ. मिलिंद भोई यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.
अंमली पदार्थांची तस्करी, विक्री यातून मिळणारा पैसा हा देशविरोधी, विघातक आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे. यामध्ये अनेक अतिरेकी संघटनांचे जाळे कार्यरत आहे. अंमली पदार्थ विरोधी कायद्यामध्ये राज्य सरकारने नुकताच बदल केला असून,हे गुन्हे आता मकोका कायद्यांतर्गत आणण्याचे सकारात्मक पाऊल उचलले आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तळेगाव दाभाडे येथील रोटरी क्लब ऑफ गोल्डन आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी 'अंमली पदार्थ आणि तरुणाई' या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. मिलिंद भोई बोलत होते. यावेळी इंद्रायणी शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, रोटरी क्लब ऑफ गोल्डनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष परदेशी, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, रोटरी क्लबचे बसप्पा भंडारी,सौरभ मेहता,कविता खोल्लम,रितेश फाकटकर,डॉ.सचिन भसे,राज्य पुरातत्व खात्याचे अधिकारी हेमंत गोसावी, डॉ. यशवंत वाघमारे आदी उपस्थित होते.
डॉ.भोई पुढे म्हणाले, " दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट,हुक्का ही व्यसने प्रयत्नपूर्वक सोडवता येतात. पण अंमली पदार्थांचे व्यसन सोडवणे अतिशय कष्टदायक व खर्चिक आहे. यामुळे व्यसन करणाऱ्या व्यक्ती बरोबरच त्याचे पूर्ण कुटुंब देशोधडीला लागते.या समस्येवर लढण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था,शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे यांनी एकत्रित लढा उभारला पाहिजे."
प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक रोटरी क्लब गोल्डनचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. इंद्रायणी शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले.या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. भोई यांच्याशी अंमली पदार्थ व्यसनांच्या प्रतिबंधाविषयी दिलखुलास संवाद साधला.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थविरोधी उपक्रमात सहभागी राहण्याविषयीची शपथ घेतली.
या कार्यक्रमाच्या आयोजनात रोटरी क्लबचे दिनेश चिखले, राकेश गरुड, दिलीप पंडित, सुरेश गोपाळे, दिशा दोरुगडे, प्रमोद परदेशी, प्रभाकर वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख विजय गोपाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत ताये यांनी केले. प्रदीप टेकवडे यांनी आभार मानले.
