अख्खं आयुष्य कचरा वेचण्यात गमावलेल्या माय-बापांचं नाव पोरांनी मात्र कमावलं अन् माय-बापांच्या स्वप्नांचं सोनं केलं!
पुणे शहरातील कचरा वेचकांच्या पाल्यांची बारावीत मोठी झेप : अनंत अडचणींवर मात करत सात जणांनी मारली बाजी

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ५ मे २०२५ :- खरं तर शिक्षणाचं माहेरघर ही पुणे शहराची खरी ओळख.पण शिक्षणाच्या माहेरघरात राहूनही माय-बापांच्या नशीबी शिक्षण नव्हतं. त्यामुळे माय-बापांच्या हाती कधी लेखणी आलीच नाही. कालांतराने पुढे या लेखणीची जागा झाडूनं घेतली आणि अख्खं आयुष्य हे पुण्यातील कचरा साफ करण्यात खर्ची घातलं. आपलं हे काम किमान आपल्या पाल्यांच्या तरी नशीबी येऊ नये, म्हणून आपल्या पाल्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, हे या कचरावेचक पालकांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी आयुष्यभर राब-राब राबून आणि पोटाला चिमटा घेत, मुलांना शाळेत घातलं आणि याच मुलांनी त्यांच्या माय-बापांच्या कष्टाची जाणीव ठेवत, त्याचं हे स्वप्न बारावीच्या परीक्षेच्या निकालात उत्तुंग भरारी घेत पूर्ण केले आहे. यातून या पोरांनी माय-बापाचं नाव तर कमावलंच पण, त्याचबरोबर या निरक्षर माय-बापांच्या स्वप्नांचेही सोने केले आहे.
पुणे शहरातील कागद,काच, पत्रावेचक कष्टकरी पंचायतमधील कचरावेचकांच्या सात पाल्यांनी अनंत अडचणींवर मात करत बारावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. श्रुती शिवाजी जाधव हिने मॉडर्न महाविद्यालयातून कला शाखेतून ८२.१७ टक्के गुण मिळवले आहेत. ती कचरा वेचक शिवाजी विठ्ठल जाधव यांची मुलगी आहे.तिचे वडील भोसलेनगर येथे काम करतात. श्रुतीला मॉडर्न कॉलेजमधून इकॉनॉमिक्समध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊन अर्थशास्त्राचे प्राध्यापक व्हायचे आहे. तशी इच्छा तिने निकालानंतर व्यक्त केली आहे.
मुंढवा येथील लोणकर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मीनाक्षी पद्माकर इंगळे हिने वाणिज्य शाखेतून राणी बारावीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळविले आहेत. ती कचरा वेचक पद्माकर इंगळे यांची मुलगी आहे.सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील साक्षी तानाजी फडके हिने वाणिज्य शाखेतून साधना 77.83 टक्के गुण मिळविले आहेत. ती कचरा वेचक तानाजी फडके यांची मुलगी आहे.
कचरा वेचक सुशिला सोनवणे यांचा मुलगा सायराज तात्याराव सोनवणे याने नेस वाडिया कॉलेजमधून कॉमर्स शाखेत ७३ टक्के गुण मिळवले आहेत. रोहित दत्तात्रय मोहिते याने ६६.१७ टक्के गुण मिळवत बारावीत बाजी मारली आहे. रोहितचे चौथीपर्यंतचे शिक्षण व्यवस्थित झाले. तो ५ वी मध्ये असताना आज्जी आजारी पडल्यामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे त्याच्या आईने कचरा वेचायला सुरुवात केली. दवाखान्याच्या चकरा आणि कामाच्या ओढाताणीमुळे त्याचे शिक्षण बिघडले आणि मध्येच खंड पडला. इयत्ता १० वी मध्ये त्याला फीट्सचा त्रास वाढला. त्यामुळे शाळेतदेखील प्रवेश मिळत नव्हता. महिनोन्-महिने शिक्षणात खंड पडत होता आणि त्यामुळे त्याचे ३ विषय राहिले. सन २०१७ ते २०२३ या कालावधीत त्याने ५ वेळा १० वीची परीक्षा दिली आणि शेवटी यशस्वी झाला. तो म्हणतो, “संघटना नसती तर मी शून्य होतो. शिकण्याची प्रेरणा मला संघटनेमुळे मिळाली. कारण मी आजूबाजूला शिकूनसुद्धा कष्टाचे काम करणारे लोक पाहिले होते. त्यामुळे वाटायचे शिकूनही हेच करायचे असेल तर काय उपयोग? पण संघटनेत आल्यावर समजले की शिक्षणामुळे अनेक पर्याय मिळू शकतात.१० वी नंतर काय करायचे हे नक्की नव्हते, म्हणून संघटनेतील कार्यकर्त्यांची मदत घेतली. त्यांनी शाळेतील शिक्षकांशी बोलून रोहितच्या आवडी समजून घेतल्या आणि त्याला व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर त्याने १२ वी मध्ये व्होकेशनल शिक्षण घेतले आणि तो आता ६६.१७ टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेणार आहे. हर्ष नितीन महावीर याने विज्ञान शाखेत ५१.१७ टक्के गुण मिळवले आहेत. त्याने १० वीमध्येसुद्धा६४.८० टक्के गुण मिळवले होते. घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती.वडील मागील ८ वर्षांपासून सोबत नाहीत. आईने एकटीने त्याचा सांभाळ घंटागाडीवर काम करून केला आणि शिक्षणात मोलाचा वाटा उचलला.हर्षला आईच्या कष्टांची जाणीव होती आणि म्हणून त्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिले.
त्याने १७ नंबरचा फॉर्म भरून १२ वीची परीक्षा दिली. कॉलेजमध्ये काही अडचण आल्यामुळे त्याला अंतर्गत परीक्षा देता आली नाही.तरीही त्याने हार न मानता हा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
साक्षी नागनाथ कांबळे हिने विज्ञान शाखेत ६४ टक्के गुण मिळवले आहेत.तिची आई रुपाली कांबळे कचरा वेचक आहे.तिने १० वीकमध्ये ७८ टक्के गुण मिळविले होते. साक्षीचे वडील १४ वर्षांपूर्वी वारले आणि त्यानंतर आईने एकटीने घरची जबाबदारी सांभाळली.वडिलांनंतर घरात कोणी कमावणारे नव्हते, त्यामुळे आईला कचरा वेचण्याचे काम करावे लागले.गेली १० वर्षे आई रुपाली कांबळे कचरा वेचक म्हणून काम करत आहे व मुलींना शिकवण्यासाठी सतत धडपड करत आहे.आईच्या कष्टांचे भान ठेवत मुली मोठ्या झाल्या आणि अभ्यासालाही त्यांनी नेहमी प्राधान्य दिले.साक्षीचा आजचा यश हे त्याचं फलित आहे.