Mit starting a modern Hospital in Pune:- पुण्यात सुरू होतेय 'माईर्स एमआयटी'चे अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णालय!
'एमआयटी'च्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.सुचित्रा कराड-नागरे यांची माहिती: येत्या सोमवारी होणार उद्घाटन

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १९ जून २०२५ :- माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेच्याह वतीने पुण्यात अत्याधुनिक व सुसज्ज असे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. हे रुग्णालय पुण्यातील कोथरूड परिसरात असणार आहे. या रुग्णालयाला 'एमआयटी' शिक्षण संस्थेचे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री सरस्वती कराड यांचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय दळणवळण व भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या सोमवारी (दि.२३ जून) या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास आणि हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे उपस्थित होते. या रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खासदार मेधा कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना डॉ. सुचित्रा कराड-नागरे म्हणाल्या,"
‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ या तत्वांशी बांधिलकी ठेवून हे रूग्णालय काम करेल. ‘रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या ब्रीद वाक्याला अनुसरून माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सौ. सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘श्री सरस्वती कराड हॉस्पिटल’ (एसएसकेएच)ची निर्मिती करण्यात आली आहे. हे रुग्णालय कोथरुड येथील पौड रोडवरीर विश्वशांती गुरुकुल स्कूलच्याजवळ उभारण्यात आले आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज २०० खाटांचे (बेड्स) हे रुग्णालय असणार आहे."
रुग्णालय उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड हे असणार आहेत. केअर (काळजी घेणे), क्युअर (उपचार देणे), हील (बरे करणे) ह्या तत्वांवर हे रुग्णालय बांधलेले आहे. यामध्ये आपत्कालीन सेवा,सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी, एक्स रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी यासारख्या सेवा २४ तास उपलब्ध असणार आहेत.शिवाय वैद्यकीय, हदयरोग, नवजात शिशु, शस्त्रक्रिया यांकरिता अतिदक्षता विभाग उपलब्ध आहे. मेडिसिन, सर्जरी, प्रसूतीशास्त्र, अस्थिरोग, सांधेरोपण, मणक्याचे विकार, मानसोपचार, त्वचाविकार, नेत्ररोग, कान -नाक-घसा, बालरोग, कॅन्सर चिकित्सा व उपचार, मेंदूविकार व चिकित्सा आणि त्यावरील उपचार इ. विशेष तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध असतील. ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयीन सेवेत १० टक्के सूट दिली जाणार आहे.