खबरदार, आता दुधात भेसळ कराल तर, ... अखेर भेसळ प्रतिबंधासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन
समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त जिल्हाधिकारी : दुधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ एप्रिल २०२५ :- महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. शिवाय डुप्लीकेट पनीरचे विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर दूधात भेसळ करणाऱ्यांना चाप लावण्याची मागणी राज्यातील विविध दूध उत्पादक संस्थांकडून केली जात होती. या मागणीसाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याबरोबर अनेकदा दूध उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. परंतु, आतापर्यंत चर्चेच्या पुढे काहीच होत नव्हते. परंतु आता सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. दूध भेसळ प्रतिबंधासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दूध भेसळ प्रतिबंधक उपाययोजना समितीची स्थापना करण्यात आली आहे. किमान या समित्यांमुळे तरी आता राज्यातील दूध भेसळीला चाप बसणार का, हे आता येणाऱ्या काळात कळू शकणार आहे.
यानुसार पुणे जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्णयानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न), जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि उप नियत्रंक वैध मापन शास्त्र विभागाचे उप नियंत्रक आदींचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, दूध संस्था (डेअरी) यांची माहिती समितीकडे देण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष सुहास मापारी यांनी केले आहे.
दूध हे मानवाच्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने ते पोषक तत्वांचा मुख्य स्रोत आहे . त्यामुळे मानवी आरोग्य चांगले राखण्यास दूध महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून काही हानीकारक पदार्थांसह दुधात भेसळ करण्याचे प्रमाण वाढल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण झाला आहे. दूध भेसळीसाठी पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि अन्य रसायनांचा सर्रासपणे वापर केला जात आहे. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टीक मुल्याशी तडजोड करीत नाहीत तर, त्यातून मानवी शारिरीक समस्या, पचन, अॅलर्जी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान यासारख्या गंभीर आरोग्य समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात.या समस्यांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दूग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील दूध संकलन स्विकृती केंद्र, पुणे जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने आणि सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणी करण्यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना दरमहा उद्दीष्ठ ठरवून देण्यात आले आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती, डेअरी विरोधात फौजदारी खटले दाखल करण्यात येणार असल्याचे या समितीने जाहीर केले आहे.
भेसळ करणाऱ्यांची येथे करा तक्रार
दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर किंवा FDAPUNE2019@GMAIL.COM या ईमेलवर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार आहे. भेसळीबाबत तक्रार, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.