पाण्याचे जतन करा, तरच पर्यावरण समतोल राहील!
डॉ. वाय. बी. सोनटक्के यांचे मत : पर्यावरण विषयक राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २६ एप्रिल २०२५ :- पर्यावरण आणि पाणी यांचा खुप जवळचा संबंध आहे. पाणी असेल तर, पर्यावरण समतोल राखता येतो. त्यामुळे पाण्याचे जतन करा, तरच पर्यावरणाचा समतोल राखता येते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करता येते,असे मत पर्यावरणीय संवर्धन क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ.वाय.बी.सोनटक्के यांनी शनिवारी (दि. २६ एप्रिल) एका परिसंवादात बोलताना व्यक्त केले.
नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल बार असोसिएशनचे (पश्चिम विभाग खंडपीठ) अध्यक्ष सौरभ कुलकर्णी यांच्यावतीने 'पर्यावरणीय उत्तरदायित्व आणि शाश्वतता' या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (एन.जी.टी.) तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी आणि आयोजक अॅड. सौरभ कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या परिसंवादात पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ई.आय. ए.), राष्ट्रीय हरित लवाद (एन.जी.टी.)आणि सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक (सी.ई.पी.आय.) या तीन बाबीसंदर्भातील विविध पैलूंवर या तज्ज्ञांनी विचार मांडले. या कार्यक्रमात पर्यावरणीय शासन आणि संवर्धन क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांनी सहभाग घेतला.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ई.आय.ए.) प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले आणि बदलत्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी 'ईआयए'च्या आशयाचा सातत्याने विकास होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. जेणेकरून प्रकल्प मूल्यांकन अधिक सखोल, व्यापक आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम राहील, असे त्यांनी सांगितले.
या परिसंवादाचे आयोजक अॅड. सौरभ कुलकर्णी यांनी औद्योगिक समूहांमध्ये पर्यावरणीय गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांकाचे (सी.ई.पी.आय.) महत्त्व या विषयावर प्रकाश टाकला. सीईपीआय मूल्यमापनाद्वारे दुरुस्ती उपाययोजना निश्चित करण्यात व नियामक हस्तक्षेप साधण्यात मदत होते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या चर्चासत्राने पर्यावरणीय जबाबदारी मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर व शाश्वत विकास पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी सखोल संवादाची संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचा समारोप प्रश्नोत्तरे सत्राने झाला.