विद्यार्थ्यांनो, बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश हवाय, तर 'जात पडताळणी' बंधनकारक!

जात पडताळणीची अजूनही संधी गेलेली नाही, इच्छुकांना ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार 

विद्यार्थ्यांनो, बारावीनंतर  व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश हवाय, तर 'जात पडताळणी' बंधनकारक!
पुणे :- 'बार्टी'चे मुख्यालय

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ८ एप्रिल २०२५ :-  विद्यार्थी मित्रांनो, यंदा तुम्ही बारावीची परीक्षा दिलीय? , बारावीनंतर कोणत्याही एका व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छित आहात? यासाठी आपणास राखीव जागांवर प्रवेशद्वार हवाय? या तीन प्रश्नांची उत्तरे हो असतील तर, आपणास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र काढण्यासाठीची अजूनही कायम आहे.कारण  इच्छुक विद्यार्थ्यांना यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे पात्र विद्यार्थ्यांना येत्या ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

समता पंधरवाड्यानिमित्त सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या आणि  बारावीनंतर  व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना आता येत्या ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ मुदत संपल्यामुळे अर्ज न करु शकलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. 'सीइटी', 'जेईई', 'नीट' आदी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि त्यानंतर  वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुविशारदशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तसेच पदवीनंतर एम.बी.ए., एम.सी.ए., एल.एल.बी. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. 

अर्ज कोठे कराल? 

इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज https://ccvis.barti.in  किंवा https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. या ऑनलाइन अर्जाची मूळ प्रत (हार्ड कॉपी) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, आळंदी रोड, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे या ठिकाणी दाखल करावेत, असे आवाहन या विभागाचे उपायुक्त आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे  सदस्य संजय दाणे यांनी केले आहे.