पुणे महापालिकेकडून झेडपीच्या स्थावर मालमत्तेचे १३७ कोटी रुपयांचे येणे बाकी!

पालिकेकडे गेल्या ८ वर्षांपासून येणे रक्कमेची बाकी शिल्लक : झेडपीचे विभागीय आयुक्त व पालिकेला पत्र 

पुणे महापालिकेकडून झेडपीच्या स्थावर मालमत्तेचे १३७ कोटी रुपयांचे येणे बाकी!
पुणे:- जिल्हा परिषद शाळा इमारत

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २६ एप्रिल २०२५ :-  पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३४ गावे ही गेल्या आठ वर्षांत टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झाली. परंतु या गावांमध्ये असलेल्या पुणे झेडपीच्या स्थावर मालमत्तेच्या किमतीची रक्कम महापालिकेने अद्यापही पुणे जिल्हा परिषदेला दिलेली नसल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेकडून येणे असलेली ही रक्कम थोडकी नसून ती तब्बल १३६ कोटी ०७ लाख ५३ हजार ७३९ रूपये इतकी आहे. ही थकीत रक्कम जिल्हा परिषदेला देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

पुणे शहरालगत असलेली जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील 34 गावे टप्प्याटप्प्याने  महानगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या गावांमध्ये आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळा, अंगणवाड्या,  प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि पशुवैद्यकीय केंद्र आदी इमारती आणि काही मोकळ्या जमिनी आहेत. सरकारी नियमानुसार एखाद्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावे अन्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात वर्ग झाल्यानंतर संबंधित गावांमधील स्थावर मालमत्तेची चालू बाजारभावानुसार असलेली किंमत मूळ संस्थेला देणे बंधनकारक आहे. कारण स्थावर मालमत्ता या हलवता येत नसतात. 

जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३४ गावांपैकी ११ गावे ही सन २०१७ मध्ये तर, उर्वरित २३ गावे सन २०२० मध्ये महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजेच सन २०१७) मध्ये पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये लोहगाव, मुंढवा, हडपसर, उरुळी देवाची,आंबेगाव खुर्द,आंबेगाव बुद्रुक, उंड्री, धायरी, शिवणे, उत्तमनगर, फुरसुंगी आदींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच सन २०२० मध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी बुद्रूक, नांदेड, न्यू कोपरे, नऱ्हे पिसोळी आदी प्रमुख गावांसह  २३ गावांचा समावेश आहे. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील हवेली आणि मुळशी तालुक्यातील उपअभियंत्यांनी आपापल्या तालुक्यातील समाविष्ट गावांमधील स्थावर मालमत्तेची तत्कालीन चालू बाजारभावानुसार किंमत निश्चित केली आहे. 

मालमत्ता प्रकारनिहाय बाजारमूल्य (रुपयांत)

- प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र (ता. हवेली) ---- २२ कोटी ७९ लाख १२ हजार ६९६.

- ग्रामपंचायत कार्यालय इमारती  (ता. हवेली) ---- ३ कोटी ८८ लाख ७९ हजार ४६३.

- शाळा इमारती (ता. हवेली) ---- ४२ कोटी ५९ लाख १७९.

-  पशुवैदयकीय दवाखाना इमारती (ता. हवेली) ----  २८ लाख ९५ हजार ०१३. 

-  मोकळया जागा (ता. मुळशी) ----  १६ कोटी ४१ लाख ३ हजार २५०.

- स्मशानभूमी (ता. मुळशी) ---- ४१ कोटी ३२ लाख ६ हजार ६७६.

- अस्मिता भवन (ता. मुळशी) ----  ९ कोटी २४ लाख ७४ हजार १२३.

- समाजमंदिर इमारती (ता. मुळशी) ---  १० कोटी २८ लाख ५ हजार ५३१.

- जि.प. शाळा व शौचालय (ता. मुळशी)  ५० कोटी ४६ लाख ६६ हजार ८०८.

 - एकूण ----  १३६ कोटी ०७ लाख ५३ हजार ७३९.