मेंढपाळ संतोषला हवा आहे दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीचा 'हात'!
बेसबॉलच्या भारतीय संघात निवड, पण पैशांअभावी हातातील संधी जाण्याचा धोका!

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ३ मे २०२५ :- आई-वडील निरक्षर आणि भुमिहीन. कुटुंबाकडे एक गुंठाही जमीन नाही. त्यामुळे अख्ख्या कुटुंबाचं हातावरलं पोट. दुसऱ्यांच्या शेतात मजुरी केल्याशिवाय दोन वेळचं पोट भरणं मुश्कील. मिळेल ते काम करणं आणि कुटुंब मूळचे मेंढपाळ असल्यामुळे कोकण व महाबळेश्वर परिसरात रानोमाळ भटकत मेंढ्या सांभाळत उदरनिर्वाह करण्याचे काम संतोषचे आई-वडील करतात. पैशाअभावी मोठ्या भावाला सातवीतच शाळा सोडावी लागली. किमान आपल्यासारखी बारक्या पोराचे तरी हाल होऊ नयेत, म्हणून आई-वडिलांनी संतोषला लहानपणापासूनच पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असलेल्या मामाकडं ठेवलं. याच संतोषने आई-वडिलांच्या विश्वावासाला तडा जाऊ नये म्हणून संधीचे सोने केले आणि त्यातूनच संतोषची बेसबॉल क्रीडा प्रकारात भारतीय संघात निवड झाली आहे. पण आई-वडील आणि भाऊ हे सर्वजण शेतमजुरी आणि मेंढी पालन करून उदरनिर्वाह करत असल्याने संतोषवर आता केवळ पैशांअभावी ही संधी सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतोषला आता समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचा 'हात' देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ही काही काल्पनिक कथा किंवा एखाद्या चित्रपटातील कथानक नसून, बारामती येथील तुळजाराम चतुरानंद महाविद्यालयात (टी. सी. कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या संतोष बाळू कचरे यांची ही सत्यकथा आणि व्यथा आहे.
संतोष हा मुळचा सातारा जिल्ह्यातील बावधन (ता. वाई) येथील रहिवासी आहे. पण त्यांच्यासाठी हे मुळ गाव फक्त नावापुरतेच आहे. कारण आई-वडील पोट भरण्यासाठी आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यासाठी कायम पश्चिम महाराष्ट्रात भटकंती करत असतात. त्यामुळे संतोषला गावात ठेवायचे कोणाकडे, या प्रश्नातून आई-वडिलांनी त्याला पाच वर्षांचा असतानाच पुणे जिल्ह्यातील मासाळवाडी (ता. बारामती) येथे मामाकडे आणून ठेवले आहे. मामाकडे राहूनच संतोष शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण करत करत बेसबॉल या क्रीडा प्रकारात मोठी गरुडझेप घेतली आहे. तो सध्या टी. सी. कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण आहे.
इराण येथे होणाऱ्या पश्चिम आशिया बेसबॉल कपच्या स्पर्धेसाठी संतोषसह महाराष्ट्रातील चार खेळांडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीचे पत्र आजच सकाळी (दि. ३ मे) संतोषला मिळाले आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून येत्या रविवारपासून (दि. ४ मे) पंजाबमध्ये प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येकी ८५ हजार रुपये भरायचे सांगण्यात आले आहे. मात्र यासाठी निवड झालेल्या संतोषची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे संतोषला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी हातभर लावणे आवश्यक आहे. तुमची मदत ही संतोषला एक चांगला भारतीय खेळाडू बनण्यासाठी कामी येणार आहे.
इराणमध्ये १५ ते २१ मे या कालावधीत होणार स्पर्धा
पश्चिम आशिया कप २०२५ साठी निवडण्यात आलेल्या भारतीय बेसबॉल संघात संतोष कचरे याचा समावेश झालेला आहे. या स्पर्धा येत्या १५ ते २१ मे या कालावधीत इराणमध्ये होणार आहेत. यासाठी भारतीय संघाचे पूर्वतयारी प्रशिक्षण शिबिर येत्या ४ ते ११ मे या कालावधीत पंजाबमधील कोडगे कॉन्सी, मासीनाना सायनो, संगरूर येथे होणार आहे.
संतोष कचरे याची बेसबॉलमधील कामगिरी
- 28 वी ज्युनियर राष्ट्रीय रौप्य पदक विजेता
- 15 वी वरिष्ठ बेसबॉल राज्यस्तरीय सहभाग.
- 16 वे वरिष्ठ बेसबॉल राज्यस्तरीय सुवर्णपदक.
- 17 वे वरिष्ठ बेसबॉल राज्यस्तरीय रौप्य पदक .
- 35 वा ज्येष्ठ राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता
- 36 वा वरिष्ठ राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता.
- 37 वा वरिष्ठ राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता.
- ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी 2021 गोल्ड मेडॅलिस्ट.
- ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी 2022 गोल्ड मेडॅलिस्ट.
- ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी 2023 गोल्ड मेडॅलिस्ट.