मराठमोळे ऑलिंपिकपटू गाजविणार दिल्ली, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज
येत्या गुरुवारी राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा बिगुल वाजणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
नवी दिल्ली, दि. १९ मार्च २०२५ :- राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्यांदा खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा स्पर्धेचा बिगुल येत्या गुरूवारी (दि.२० मार्च) वाजणार असून, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मराठमोळे पॅरीस पॅरा ऑलिम्पिकपटू सुकांत कदम, संदीप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावीत भाग्यश्री जाधव हे दिल्लीतील स्पर्धेत सुवर्ण पदकांचे दावेदार आहेत.
दुसरी खेलो इंडिया पॅरा स्पर्धा येत्या २० ते २७ मार्च या कालावधीत नवी दिल्लीतील ३ क्रीडा संकुलात रंगणार आहे.
ही स्पर्धा आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी व टेबलटेनिस या विविध ६ क्रीडा प्रकारात होणार असून, यासाठी देशभरातील १ हजार ३०० क्रीडापटू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम व डॉ. कर्णी सिंग शूटींग रेंज सज्ज झाली आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे ७८ क्रीडापटू पात्र ठरले आहेत. सर्वाधिक ३६ खेळाडू अॅथलेटिक्समध्ये पदकांसाठी झुंजणार आहेत. खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी असे एकूण १२० जणांचे पथक असणार आहे. दिल्लीतील पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने १३ सुवर्ण, ७ रौप्य, १६ कांस्यपदकांसह एकूण ३६ पदकांची कमाई केली होती. गत स्पर्धेत महाराष्ट्राला पाचवे स्थान प्राप्त झाले होते. यंदा महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करून क्रमवारीत मुसंडी मारतील, असा विश्वास पथकप्रमुख मिलिंद दिक्षीत यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा बॅडमिंटन, अॅथलेटिक्स व नेमबाजीचा संघ पुण्यातून रवाना झाला आहे. या संघाला राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
बॅडमिंटन स्पर्धेला गुरूवारपासून सुरूवात होत आहे. महाराष्ट्राच्या विजयाची मोहीम बॅडमिंटन कोर्टपासून सुरू होणार आहे. सांगलीचा सुकांत कदम एस. एल.४ गटात सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार आहे. जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असणार्या सुकांतने पॅरीस ऑलिंपिकमध्येही चमकदार कामगिरी केली होती. प्रथमच तो खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत खेळणार आहे. बॅडमिंटनमध्ये नीलेश गायकवाड, मार्क धरमाई, प्रेम अले, आरती पाटील हे महाराष्ट्राचे खेळाडूंही विजयासाठी मैदानात खेळताना दिसतील.
येत्या शुक्रवारपासून (दि.२१ मार्च) अॅथलेटिक्सचा थरार रंगणार आहे. संदीप सलगर, भाग्यश्री जाधव, दिलीप गावीत हे ऑलिंपिकपटू पॅरीस अॅथलेटिक्सचे मैदान गाजविताना दिसतील. हातावर शस्त्रक्रिया झाल्याने भालाफेकपटू संदीप सलगरला पहिल्या स्पर्धेपासून वंचित रहावे लागले होते. संदीप प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत खेळणार असून तो सुवर्णपदकासाठी फेकी करताना दिसेल. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या संदीपची ६७ मीटर ही सर्वोत्तम कामगिरी असल्याने संभाव्य विजेता म्हणून त्याचाच दिल्लीत डंका राहणार आहे.
गत स्पर्धेत भालाफेक व गोळाफेकीत दोन सुवर्णपदके जिंकणारी भाग्यश्री जाधव स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरणार आहे. सलग दुसर्यांदा दुहेरी सुवर्णपदकासाठी ती सज्ज झाली आहे. ४०० मीटर शर्यत गाजविणारा दिलीप गावीत सलग दुसर्यांदा पदकासाठी उत्सुक आहे. नेमबाजीत कोल्हापूरचा ऑलिंपिकपटू स्वरूप उन्हाळकर तर, आर्चरीत मुंबईचा आशियाई पदकविजेता आदील अन्सारी हे सलग दुसर्यांदा सुवर्ण पदकाचा वेध घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.