पुणे झेडपीतील लाचखोर वरिष्ठ अधिकारी निलंबित, 'सीईओं'ची कारवाई,अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निलंबनाबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला 

कंत्राटदारांची केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी लाच स्विकारताना झाली होती तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक 

पुणे झेडपीतील लाचखोर वरिष्ठ अधिकारी निलंबित, 'सीईओं'ची कारवाई,अन्य दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निलंबनाबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला 
पुणे जिल्हा परिषद मुख्यालय

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ मार्च २०२५ :-  पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन लाचखोर वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याला जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले असून, अन्य दोन लाचखोर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निलंबनाबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठविला आहे. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तीनही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले होते. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी लाच संबंधित तक्रारदार व्यक्तीकडे सुमारे दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये 
कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय ५७ वर्षे), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५७ वर्षे) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश होता. यापैकी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी निलंबित केले असून बाबुराव पवार आणि उपअभियंता दत्तात्रेय पवार यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. 

सरकारी सेवेतील तरतुदीनुसार कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी २४ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यास, संबंधिताचे निलंबन करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील तीनही लाचखोर अधिकारी हे तीन दिवसांहून अधिक काळ पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिले आहेत. दरम्यान, कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहेत. यानुसार त्यांनी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांना निलंबित केले आहे.

कार्यकारी अभियंता व  उपअभियंता यांना निलंबित करण्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला आहेत. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव अधिक्षक अभियंत्यांकडे पाठविण्यात आला आहे.