पुणे झेडपीत मंगळवारी पडला नोटांचा पाऊस, नोटा उधळत एकाने केले अनोखे आंदोलन
आंदोलक व्यक्ती होती ग्रामपंचायत कर्मचारी : झेडपीच्या १० टक्के नोकर भरतीत अन्याय झाल्याचा दावा

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ मार्च २०२५ :- पुणे जिल्हा परिषद मुख्यालयात मंगळवारी (दि.२५) चक्क नोटांचा (पैशांचा) पाऊस पडला. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने झेडपीच्या नोकरभरतीत जिल्हा परिषदेने अन्याय केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील आतील बाजूस असलेल्या एका मोकळ्या जागेत नोटा उधळल्या. या नोटा उधळत असताना संबंधित कर्मचाऱ्याने स्वतःच्या गळ्यातही नोटांचा हार घातला होता. उधळण्यात आलेल्या दहा आणि वीस रुपयांच्या नोटांची संख्या लक्षणीय होती. या घटनेने जिल्हा परिषद मुख्यालयात काही काळ मोठी खळबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दोनच आठवड्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी नोटा उधळण्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा हा कर्मचारी असून, अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नोटा उधळल्यानंतर काही काळ सिरसाठ हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. दरम्यान, दुपारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
जिल्हा परिषदेच्या नोकरी भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता यादीत ३४ वा क्रमांक आहे. मात्र या नोकर भरतीत सन २०२१-२२ या नोकर भरती वर्षात अन्याय झाल्याचा आरोप सिरसाट यांनी आंदोलन करताना केला आहे.
खडकाळा (ता. मावळ) ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल सिरसाट यांनी सन २०२१-२२ या नोकर भरती वर्षात ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून भरल्या जाणाऱ्या भरतीत त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. शिवाय या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले आहे. त्यांच्यावर मंत्रालयातील आंदोलनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. नियम डावलून नोकरी भरती करता येत नाही. मात्र अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
- विजयसिंह नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), जिल्हा परिषद, पुणे.