दानशूर पुणेकरांचा मेंढपाळ संतोषच्या पाठीवर आर्थिक मदतीचा आणि शाब्बासकीचा 'हात', अवघ्या दोनच दिवसात आवश्यक रक्कम जमा!
'आपला परीसर'चे उज्ज्वल केसकर व मित्रपरिवार अन् रोहित पवार यांची मोलाची मदत : 'ग्रामराज्य'च्या बातमीचा फायदा

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ मे २०२५ :- 'पुणे तिथे काय उणे' अशी एक म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे.या म्हणीचा प्रत्यय बेसबॉल या खेळाचा राष्ट्रीय खेळाडू असलेल्या मेंढपाळ संतोष कचरे या २२ वर्षीय महाविद्यालयीन युवकाला आला. दानशूर पुणेकरांमुळे संतोषला अवघ्या दोनच दिवसांत अपेक्षित आर्थिक मदत मिळाली आहे. मदतीची ही रक्कम संबंधित व्यक्तींनी थेट संतोषच्या बॅंक खात्यात जमा केली आहे. यासाठी पुण्यातील 'आपला परिसर' या संस्थेचे प्रवर्तक आणि पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर व त्यांच्या मित्र परिवाराची आणि आमदार रोहित पवार यांची मोलाची मदत झाली आहे. दरम्यान, भारतीय बेसबॉल संघात निवड होऊनही केवळ पैशांअभावी ही संधी आपल्या हातातून जाते की काय, या भितीने धास्तावलेल्या संतोषला या मदतीने मोठा दिलासा मिळाला आहे. दानशूर पुणेकरांचा आर्थिक मदतीचा 'हात' आणि शुभेच्छा व पाठिंब्यासह संतोष मंगळवारी (दि. ६ मे) रात्री भारतीय संघात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे. पुण्यातील ग्रामराज्य मराठी न्यूज पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळेच मोठी आर्थिक मदत मिळू शकल्याची भावना राष्ट्रीय खेळाडू संतोष कचरे याने व्यक्त केली आहे.
पुणे शहरातील 'आपला परिसर' या संस्थेचे प्रवर्तक उज्ज्वल केसकर यांनी आर्थिक मदत करण्यासाठी ग्रामराज्मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अगदी पहिल्या पाच मिनिटांपासून मोठा पुढाकार घेतला. केसकर यांच्याशिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही मोलाची आर्थिक मदत केल्याचे खेळाडू संतोष कचरे याने सांगितले. दरम्यान सर्व दानशूर पुणेकरांचे संतोष कचरे याने जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील तुळजाराम चतुरानंद महाविद्यालयाचा (टी. सी. कॉलेज) विद्यार्थी संतोष कचरे हा राष्ट्रीय बेसबॉल खेळाडू आहे. त्याची नुकतीच इराण येथे होणाऱ्या पश्चिम आशिया बेसबॉल कप या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र या स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी आणि प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेला ८५ हजार रुपयांच्या खर्चाची रक्कम आधी भरणे बंधनकारक होते. संतोषची घरची आर्थिक परिस्थिती खुपचं नाजूक आहे. त्यामुळे त्याला हे पैसे भरणे शक्य नव्हते. परिणामी भारतीय संघात निवड होऊनही केवळ पैशांअभावी संतोषच्या हातातून ही संधी जाण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबतचे वृत्त ग्रामराज्य मराठी न्यूज पोर्टलने ३ मे रोजी दुपारी पावणेदोन वाजता प्रसिद्ध केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच, अवघ्या पाचच मिनिटांत या वृत्ताला सकारात्मक प्रतिसाद देत, 'आपला परिसर'चे उज्ज्वल केसकर यांनी त्यांच्या संस्थेच्य वतीने दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि ही रक्कम तत्काळ संतोषच्या खात्यावर जमा केली. केसकर हे केवळ रक्कम जमा करुनच थांबले नाहीत, तर अपेक्षित रक्कम जमा झाली की नाही, याबाबतची माहिती ते सातत्याने घेत होते. एवढेच नव्हे तर, शेवटच्या क्षणी अपेक्षित रक्कम पूर्ण होण्यासाठी कमी पडत असलेल्या रक्कमेचीही केसकर यांनी त्यांच्या मित्रमंडळीकडून तत्काळ व्यवस्था केली. यामुळे ही अपेक्षित रक्कम पूर्ण होऊ शकली.
ग्रामराज्य न्यूज पोर्टलने 'मेंढपाळ संतोषला हवा आहे दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीचा 'हात' या शीर्षकाखाली हे वृत्त प्रसिद्ध केले होते. संतोष हा मुळचा सातारा जिल्ह्यातील बावधन (ता. वाई) येथील रहिवासी आहे. पण त्याच्यासाठी हे मुळ गाव फक्त नावापुरतेच आहे. कारण आई-वडील पोट भरण्यासाठी आणि मेंढ्या चारण्यासाठी कायम पश्चिम महाराष्ट्रात भटकंती करत असतात. त्यामुळे संतोषला गावात ठेवायचे कोणाकडे, या प्रश्नातून आई-वडिलांनी त्याला पाच वर्षांचा असतानाच पुणे जिल्ह्यातील मासाळवाडी (ता. बारामती) येथे मामाकडे आणून ठेवले आहे. मामाकडे राहूनच संतोष शालेय व महाविद्यालयीन शिक्षण करत करत बेसबॉल या क्रीडा प्रकारात मोठी गरुडझेप घेतली आहे.
इराण येथे होणाऱ्या पश्चिम आशिया बेसबॉल कपच्या स्पर्धेसाठी संतोषसह महाराष्ट्रातील चार खेळांडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीचे पत्र संतोषला दि. ३ मे ३०२५ रोजी सकाळी मिळालेहोते. या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून दि.४ मेपासून पंजाबमध्ये प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. परंतु संतोष कचरे हा या शिबिरासाठी प्रत्येकी ८५ हजार रुपये भरणे अनिवार्य केले होते. मात्र यासाठी निवड झालेल्या संतोषची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्यामुळे संतोषला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीसाठी हातभर लावणे आवश्यक आहे. तुमची मदत ही संतोषला एक चांगला भारतीय खेळाडू बनण्यासाठी कामी येणार असल्याचे ग्रामराज्यच्या वृत्तात नमूद केले होते.
या वृत्तानुसार उज्ज्वल केसकर यांनी आपला परिसर ही संस्था आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने रोख ३० हजार रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी २५ हजार रुपये आणि पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी दहा हजार आणि बारामतीतील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.