Maharashtra State zilla Parishad Staff :- राज्यातील झेडपी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी धडपडणारा पुणे झेडपीतील अवलिया : जगदीश महामुनी

सेवा प्रवेशोत्तर परीक्षेच्या यशासाठी धडपड : 'मी यशस्वी होणार' उपक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन 

Maharashtra State zilla Parishad Staff :- राज्यातील झेडपी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी धडपडणारा पुणे झेडपीतील अवलिया : जगदीश महामुनी
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी जगदीश महामुनी.

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ जून २०२५ :-  समाजाशी आपलं काही देणं आहे, या भावनेतून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी मागील पाच वर्षांपासून धडपड करणारा एक अवलिया पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. हा अवलिया आपली स्वतःची सरकारी नोकरी सांभाळून  मागील पाच वर्षांपासून सातत्याने यासाठी धडपडत आहे. या अवलियाने यासाठी खास 'मी यशस्वी होणार' हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व झेडपी कर्मचारी हे सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत यशस्वी व्हावेत, या ध्येयाने पेटून उठलेला हा पुणे झेडपीतील कर्मचारी सेवा प्रवेशोत्तर परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गांचे सातत्याने आयोजन करत आहे. या कर्मचाऱ्याच्या या धडपडीमुळे सर्व जिल्हा परिषदांमधील शेकडो कर्मचारी दरवर्षी सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत यशस्वी होऊ लागले आहेत.

आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या यशस्वितेसाठी धडपडणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव जगदीश महामुनी असे आहे. सध्या महामुनी हे पुणे जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर काम करत आहेत. आपल्या सहकाऱ्यांच्या भल्यासाठी अशा पद्धतीचा उपक्रम  सर्वांसाठी मोफत राबविणारे महामुनी हे राज्यातील एकमेव जिल्हा परिषद कर्मचारी आहेत. 

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जगदीश महामुनी यांनी 'आनंदी मित्रांचा समूह' या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून महामुनी हे आपली नोकरी, नोकरीतील जबाबदाऱ्या आणि कार्यालयीन कामकाज सांभाळून सुट्टीच्या दिवशी सेवा प्रवेशोत्तर परीक्षेच्या तयारीसाठीचे ऑनलाईन मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करत असतात. त्यांनी आनंदी मित्र व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामावून घेतले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असा 'मी यशस्वी होणारच' या ऑनलाइन मार्गदर्शनाची सेवा सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी आनंद मित्र यांच्यावतीने जगदीश मंगल प्रभाकर महामुनी यांच्या संकल्पनेतून 'मी यशस्वी होणारच' हे ऑनलाईन मार्गदर्शन सुरू करण्यात आले. ते मागील पाच वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचा उपयोग हा सर्व कर्मचाऱ्यांना होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्हॉट्सॲप ग्रुपचा सदुपयोग करण्याची किमया जगदीश महामुनी यांनी करून दाखवली आहे.

दरम्यान, या वर्षाची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेशोतर परीक्षा ही शनिवारी (दि.७ जून) आणि रविवारी (दि. ८ जून) या दोन्ही दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर जगदीश महामुनी यांच्या या उपक्रमाची माहिती आपणा सर्वांना व्हावी, या उद्देशाने हा अनोखा उपक्रम आपणा सर्वांच्या माहितीसाठी देण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेच्या सेवेत नियुक्ती झाल्यानंतर कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि ग्रामसेवक आदी संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षांच्या कालावधीत कमाल 3 प्रयत्नात सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. झेडपीतील सर्व कर्मचाऱ्यांना विहित कालावधीत ही परीक्षा उत्तीर्ण होता यावी, या हेतूने 'एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' या  संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे आपणाकडून जे जे शक्य होईल, ती ती मदत केली पाहिजे. मात्र यामध्ये आर्थिक हितसंबंध आड येता कामा नयेत, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते, या उदात्त हेतूने राज्यभरातून आनंदी मित्रांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला असल्याचे जगदीश महामुनी यांनी सांगितले. 

या आनंदी मित्र व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मराठवाड्यातील धाराशिव झेडपीतील कक्ष अधिकारी संजीव शिंदे, छत्रपती संभाजीनगर झेडपीतील दत्तात्रेय वाणी आणि पुण्यातील जगदीश  महामुनी आदींसह वर्षा पवार, शितल भानुसगरे सोलापूर येथील सचिन मायनाळ, राजेश देशपांडे, अमरावती येथील शारदा चिमूरकर, कोल्हापूर येथील सचिन मगर, शैलेश पाटणकर, भंडारा येथील अस्मिता मेश्राम, यवतमाळ येथील स्मिता मेश्राम, नागपूर येथील प्रल्हाद गरडे आदी अनेक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद कर्मचारी मार्गदर्शन ग्रुप तयार केले आहेत‌‌. या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सेवा प्रवेशोतर परीक्षेसाठीची सर्व पुस्तके पीडीएफ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सध्या याचे एकूण सहा व्हॉट्सॲप ग्रुप असून प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येकी १ हजार २५ असे एकूण ६ हजार २५० सदस्य आहेत. 

या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी खंडाळा (जिल्हा सातारा) पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून करत आहेत‌. यासाठी तांत्रिक सहाय्य ओम महामुनी हे तर नियोजन जयेश महामुनी, शोभा महामुनी हे करत आहेत. या वर्गामुळे आतापर्यंत शेकडो कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठीही या वर्गाचा  उपयोग होत असून नियमित कामकाज करतानासुद्धा हे मार्गदर्शन उपयुक्त ठरत आहे.

या व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे सेवा प्रवेशोत्तर परीक्षेसाठी आवश्यक असलेले सर्व पुस्तके, सर्व नोट्स, विविध योजनांची माहिती सातत्याने उपलब्ध करून देण्यात येते. शिवाय कर्मचाऱ्यांना नियमित कामकाज करत असताना निर्माण होणाऱ्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळेच या समूहासाठी उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 

- जगदीश महामुनी, 
कनिष्ठ प्रशासन अधिकारी 
पुणे जिल्हा परिषद, पुणे.