Fake disability certificates cross varification demand:- ससूनमधील डॉक्टर हे त्यांनीच आधी दिलेली बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे फेरतपासणीत बोगस ठरवणार कसे?, फेरतपासणी केवळ फार्स!
ससूनमधील डॉक्टरांनी दिलेल्या बोगस प्रमाणपत्रांची अन्य जिल्ह्यांमध्ये फेरतपासणी हवी : प्रहार क्रांती आंदोलन संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांची मागणी

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ जून २०२५ :- पुण्यातील ससून रुग्णालयातील काही डॉक्टर हे 'लक्ष्मी'चा लाभ मिळाल्याने अनेकांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देत आहेत. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सेवेत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी ससूनमधून अशी बोगस प्रमाणपत्रे मिळविली आहेत. आता जिल्हा परिषदेच्या एका आदेशानुसार याच प्रमाणपत्रांची फेरतपासणी ही ससून रुग्णालयातील डॉक्टर करणार आहेत. पण ज्या डॉक्टरांनी लक्ष्मी दर्शनाचा लाभ मिळाल्याने स्वतःच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दिलेली आहेत. तेच डॉक्टर फेरतपासणीत ही बोगस प्रमाणपत्रे बदलणार कसे?. कारण ते स्वतः दिलेले प्रमाणपत्र बोगस ठरवून स्वतःला खोटे ठरवू शकणार नाहीत. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरतपासणी हा केवळ एक फार्स ठरणार आहे. त्यामुळे बोगस दिव्यांगांना शोधण्यासाठी या बोगस प्रमाणपत्रांची फेरतपासणी ही अन्य जिल्ह्यांमध्ये त्यातही ती इन-कॅमेरा करावी,अशी मागणी प्रहार क्रांती आंदोलन संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी सेवेत दाखल होताना आणि पदोन्नतीचा लाभ घेताना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केली आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांगांवर मोठा अन्याय झाला आहे. जे शिक्षक व कर्मचारी दिव्यांग व गंभीर आजारी आहेत. त्यामध्ये अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांच्या टक्केवारीचे प्रमाण वाढवून घेतले आहे. हीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करुन त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करुन लाभ घेतले आहेत. काही कर्मचारी व शिक्षक हे नोकरीत रुजू होताना दिव्यांग नव्हते. तसेच त्यांचा आजपर्यंत कोणताही अपघात झाल्याची नोंद नाही. तरी देखील हे कर्मचारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करुन शासकीय लाभ घेत आहेत, अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यामुळे या सर्व बाबींची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे सुरेखा ढवळे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांना ससून सर्वोपचार रुग्णालयांमध्ये फेरतपासणी करण्याचा आदेश दिला आहे. कारण काही शिक्षकांनी जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये सूट मिळण्यासाठी दिव्यांगत्वाची बोगस प्रमाणपत्रे दाखल केल्याचे आढळून आले आहे. सुमारे ८ ते १० वर्षापूर्वी आजारावर उपचार केल्यानंतर आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांची देखील फेरतपासणी करण्याची प्रहार क्रांती आंदोलन संघटनेची मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारक शिक्षक व कर्मचारी हे दुचाकी आणि चारचाकी वाहने सफाईदारपणे चालवताना सर्रासपणे दिसत आहेत.वाहन चालविण्यासाठीचा आवश्यक परवाना मिळवतानाही त्यांनी प्रशासनाची फसवणूक केली आहे. अशा अनेक शिक्षक व कर्मचा-यांनी ससून सर्वोपचार रुग्णालयाकडूनच बोगस प्रमाणपत्रे मिळवलेली आहेत. त्या कर्मचाऱ्यांचीच फेरतपासणी पुन्हा ससून रुग्णालयाकडून होणार असल्याने बोगस प्रमाणपत्रे काढण्यासाठी सामील असलेले ससून रुग्णालयातील संबंधित वैद्यकीयअधिकारी हे फेरतपासणीमध्येसुद्धा पुन्हा या कर्मचाऱ्यांना मदत करतील व त्यांना निर्दोष ठरवतील. त्यामुळे तपासणी होत असताना तपासणीचे चित्रीकरण (इन कॅमेरा) करण्यात यावे आणि या चित्रीकरणाची प्रत संघटनेला मिळावी. अन्यथा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटने मार्फत ससून रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा गंभीर इशारा महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी दिला आहे.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनाही सुरेखा ढवळे यांचे पत्र
दरम्यान, प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनाही पत्र देण्यात आले असून सरकारी कर्मचाऱ्यांना ससूनकडून देण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेरपडताळणीची मागणी सुरेखा ढवळे यांनी केली आहे. जिल्हा परिषद सेवेत दाखल झालेल्या किंवा पदोन्नती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांगत्वाची खोटी व चूकीची प्रमाणपत्रे सादर करून प्रशासनाची नियुक्ती, पदोन्नती व बदलीमध्ये दिशाभूल केलेली असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.