Pune zp ceo visit :- जिल्ह्यातील पालखी मार्गावरील गावातील वारकऱ्यांच्या पायाभूत सुविधांची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करा!

पुणे झेडपीचे सीईओ गजानन पाटील यांच्या सूचना : 'सीईओं'कडून पालखी मार्गावरील गावांची पाहणी 

Pune zp ceo visit :- जिल्ह्यातील पालखी मार्गावरील गावातील वारकऱ्यांच्या पायाभूत सुविधांची कामे ५ जूनपर्यंत पूर्ण करा!
पुणे:- पालखी मार्गावरील गावातील वारकऱ्यांच्या पायाभूत सुविधांची पाहणी करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २५ मे २०२५ :-  जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज‌ या दोन्ही पालख्यांची आषाढी वारी येत्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासन सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील गावे आणि पालख्यांचा मुक्काम असलेल्या गावांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे पाहणी करत आहेत.या पाहणी दौऱ्यात पाटील यांनी वारकऱ्यांना पुरविण्यात येत असलेल्या सुविधांची अपूर्ण कामे ही येत्या ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

यंदाची आषाढी वारी ही जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावरील गावांमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांची उत्तम व्यवस्था व्हावी, या उद्देशाने पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील पालखी मुक्कामांची गावे, विसावे आदींची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात त्यांनी पालखी मार्गावरील गावातील सोयी-सुविधा व नियोजनाची तपासणी केली. यानुसार पाहणी दिनांक 24 मे 2025 रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखी त्यांनी शनिवारी (दि.२४ मे) लोणी काळभोर व कदम वस्ती ते सराटीपर्यंत तर, रविवारी (दि. 25 मे ) श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावरील सर्व मुक्काम व विसावे असलेल्या गावांची पाहणी केली.

सीईओ पाटील यांनी यावेळी पालखी तळ व्यवस्था, गाव आणि परिसराची साफसफाई, पालखी मार्ग, पिण्याचे पाणी, पाण्याचे स्त्रोत, वारकऱ्यांची निवास व्यवस्था, वारकऱ्यांचा निवारा कक्ष, महिला वारकऱ्यांकरिता हिरकणी कक्ष, आरोग्य बुथ स्वच्छतेसाठी शौचालय उभारणी, वाहतूक नियोजन,अखंडित वीज पुरवठा आदी सुविधाच्या उपलब्धततेच्या सद्यःस्थितीची माहिती घेतली आणि यामध्ये आढळून आलेली अपूर्ण कामे ही येत्या ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 

या पाहणी दौऱ्यात  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,  ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी,  स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अप्पासाहेब गुजर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  अमित पाथरवट आणि  पालखी मार्गावरील गावे असलेल्या हवेली, दौंड इंदापूर, बारामती आणि पुरंदर या तालुक्यांच्या पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी सहभागी झाले होते.