सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले यांचे निधन
विद्यापीठाच्यावतीने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडून श्रद्धांजली : आज अंत्यसंस्कार होणार

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ मे २२५ :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलसचिव सुभाषचंद्र भोसले यांचे शनिवारी (दि.२४ मे) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी ( दि. २५ मे २०२५) रोजी सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड येथील लिंक रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, पुणे विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दिवंगत भोसले हे सन १९७९ ते १९८६ या कालावधीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (तत्कालीन पुणे विद्यापीठ) कुलसचिव होते. त्यानंतर पुन्हा एकदा सन १९९१ आणि सन १९९४ ते १९९५ या कालावधीत त्यांनी कुलसचिव म्हणून काम केले.तीन वेळा मिळून एकूण दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदाची जबाबदारी सांभाळली. सध्या ते मुलांकडे खारघर, मुंबई येथे मुलाकडे राहत होते.
कुलसचिव पदाच्या कार्यकाळात दिवंगत सुभाषचंद्र भोसले यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवाय विद्यापीठाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. विद्यापीठात विविध प्रशासकीय सुधारणा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पारदर्शी व सक्षम प्रशासक अशी त्यांची ओळख होती.अमेरिकेतील उद्योजक क्षितीज भोसले हे त्यांचे पूत्र होत.