पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक संस्थेला ७ संगणक संच भेट

आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना फायदा होणार : पुणे जिल्हा कंत्राटदार असोसिएशनचा पुढाकार 

पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक संस्थेला ७ संगणक संच भेट
पुणे :- नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक संस्थेला संगणक संच भेट देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्र काटकर. यावेळी युवकमित्र परिवार संस्थेचे प्रविण महाजन आणि पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले व त्यांचे पदाधिकारी.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ मे २०२५ :-  महाराष्ट्रातील नंदूरबार या आदिवासी जिल्ह्यांत काम करत असलेल्या सामाजिक संस्थेला पुण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सात संगणक संच भेट देण्यात आले. या संगणकांचा आदिवासी भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

मुळचे नंदुरबार जिल्ह्यातील आणि सध्या पुणे जिल्हा परिषदेत कर्मचारी असलेले प्रवीण महाजन हे मागील अनेक वर्षांपासून आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी काम करत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाजन सध्या नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात संगणक साक्षरता अभियान राबवित आहेत. यासाठी त्यांनी युवकमित्र परिवार या नावाने सामाजिक संस्था सुरु केली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ.सुरेंद्र काटकर यांच्या हस्ते युवकमित्र परीवार संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन यांच्याकडे बुधवारी (दि.७ मे) हे सात संगणक सुपूर्द करण्यात आले.हे संगणक उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी मोठा पुढाकार घेतला. भोसले यांच्या सहकार्यामुळे हे संगणक उपलब्ध झाले.या संगणकाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये सुसज्ज संगणक प्रयोगशाळा स्थापन केली जाणार असल्याचे प्रवीण महाजन यांनी यावेळी सांगितले.