राज्यातील ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, आता येत्या २६ मेपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार!
शिक्षण खात्याकडून सुधारित वेळापत्रक जाहीर : प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी बदल

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ मे २०२५ :- महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात शिक्षण विभागाने बदल केला आहे. यामुळे पुर्वनियोजित वेळापत्रकानुसार २१ मे रोजी सुरू होणारी ही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसून ती आता सुधारित वेळापत्रकानुसार येत्या सोमवारपासून (दि.२६ मे) सुरू होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी पुर्वीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी जाहीर केले आहे.
राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी यंदापासून संपूर्ण राज्यभर ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापर्यंत केवळ महानगरांमध्येच ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. राज्यात यंदा अकरावीच्या प्रवेशांची एकूण क्षमता ही २० लाख ४३ हजार २५४ इतकी आहे. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक ८ लाख ५२ हजार २०६ जागांचा समावेश आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी ही गेल्या बुधवारपासून (दि.२१ मे) सुरू होणार होती. प्रत्यक्षात ही फेरी अद्याप सुरू झालेली नाही. राज्याच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्रातील इयत्ता अकरावीच्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाच्या पहिल्या फेरीचे सुधारित सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.
या वेळापत्रकानुसार दि.२६ मे सकाळी ११ वाजल्यापासून नोंदणी सुरू (रजिस्ट्रेशन) केली जाणार आहे. ही नोंदणी येत्या ३ जून २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. विद्यार्थ्यांना याच कालावधीत अकरावीच्या प्रवेशासाठीचे ऑनलाईन अर्ज भरावे लागतील आणि या अर्जात प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयांचे किमान एक व कमाल दहा पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. व्यवस्थापन, इन-हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी प्रत्येक फेरीपूर्वी "Consent" आवश्यक आहे.
पहिल्या फेरीचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे
- तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करणे --- दि. ५ जून.
- हरकती व दुरूस्ती करणे --- दि. ६ जून.
- हरकती व दुरुस्ती प्रक्रिया लॉगीनद्वारे ---
दि. ६ व ७ जून.
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे --- दि. ८ जून.
- अल्पसंख्याक, इन-हाऊस, व्यवस्थापन कोटा प्रवेश --- ९ ते ११ जून
- गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप करणे (शून्य फेरी) --- दि. ९ जून.
- वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर टाकणे --- दि. १० जून.
प्रत्यक्ष महाविद्यालयात - प्रवेश (पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य) --- दि. ११ जून ते १८ जून
- दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी जाहीर करणे ---- दि. २० जून
पालकांनो, हे लक्षात ठेवा
- कॅप (CAP) किंवा कोटामार्फत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाणार.
- एकदा विद्यार्थ्यांने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येणार.
- प्रवेश नोंदणी शुल्क डिजिटलमाध्यमातूनच स्विकारला जाणार
- सर्वानी प्रवेशाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक.
अकरावी प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा
www.mahafyjcadmissions.in
किंवा
support@mahafyjcadmissions.in