पुणे जिल्ह्यातील सर्व खासगी व धर्मादाय हॉस्पिटलच्या बिल आकारणीची पडताळणी करा. 

पुणे झेडपीच्या माजी सदस्यांची 'सिईओं' गजानन पाटील यांच्याकडे मागणी

पुणे जिल्ह्यातील सर्व खासगी व धर्मादाय हॉस्पिटलच्या बिल आकारणीची पडताळणी करा. 
पुणे जिल्हा परिषद :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना निवेदन देताना माजी पदाधिकारी आणि सदस्य.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ७ एप्रिल २०२५ :-  पुणे शहरातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अड्डेलतट्टू भूमिकेमुळे गर्भवती दगावलेल्या प्रकरणाची पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांनी गंभीर दखल घेतली आहे. पुणे शहरांपेक्षा जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील खासगी व धर्मादाय रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारुन अक्षरशः दीन-दुबळ्या व गरीब लोकांची आर्थिक लूट करु लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हॉस्पिटलमार्फत रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या देयकांची (बिले) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत कडक तपासणी करावी, अशी मागणी या माजी सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे सोमवारी (दि.७ एप्रिल) निवेदनाद्वारे केली. 

 ग्रामीण भागातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) ही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात केली जाते. मात्र जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटल्स हे  रजिस्ट्रेशन न करताच सुरु करण्यात आलेली आहेत. या सर्व हॉस्पिटलकडून अनेकदा पेशंटला अवाजवी बिले आकारली जातात. काही वेळा पैसे नसल्याने रुग्णांना उपचार नाकारले जातात, असा आरोप या माजी सदस्यांनी निवेदनात करण्यात आला आहे. 

यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि ग्रामीण भागातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी जिल्हा परिषद प्रशासनाने घ्यावी. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांच्या याबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात हेल्पलाईन सुरू करावी, उपचार आणि बिलासंबंधी येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे,बिलांचे ऑडीट करावे, यासाठी प्रशासनाने एक समिती स्थापन करावी, अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन अशा प्रकरणांतील दोषींवर कालमयदित कार्यवाही करण्यात यावी, गरज नसलेलीऔषधे रुग्णांना नाहकपणे खरेदी करायला लावली जातात. त्यामुळे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास, अशा मेडिकल बिलांचीदेखील तपासणी करण्याची व्यवस्था करावी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गतसुद्धा अनेक हॉस्पिटल्स हे रुग्णांना उपचार नाकारतात किंवा खूप वेळ लावतात, यावर  तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात आदी मागण्या या माजी सदस्यांनी केल्या आहेत. 

या निवेदनावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि कृषी सभापती शरद बुट्टे पाटील, माजी उपाध्यक्ष  रणजीत शिवतरे, बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रमोद काकडे,  माजी सदस्य वीरधवल जगदाळे, प्रताप पाटील आणि श्रीमंत ढोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.