The iron bridge collapsed :- मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला, दोघांचा मृत्यू 

पुणे जिल्हा प्रशासनाला ३६ व्यक्तींना वाचविण्यात यश : १६ जखमींवर उपचार सुरू 

The iron bridge collapsed :-  मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला, दोघांचा मृत्यू 
पुणे:- इंद्रायणी नदीवरील रविवारी कोसळलेला लोखंडी पूल.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५ जून २०२५ :-  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी (दि. १५ जून) साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेतून ३६ व्यक्तींना वाचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेतून बचावलेल्या ३८ पैकी १८ जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उर्वरित १६ जखमींवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मावळ तालुक्यातील कुंडमळा परिसरातील आजुबाजूच्या गावांना जोडणारा हा लोखंडी पूल सुमारे 30 वर्ष जुना आहे. हा पूल कोसळल्याची घटना घडली, त्यावेळी या पुलाच्या ठिकाणी अंदाजे 100 ते 125 पर्यटक वर्षा विहारासाठी आले होते, असे पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विठ्ठल बनोट्टे यांनी सांगितले. 

या दुर्घटनेमधून बचावलेल्या 38 व्यक्तींपैकी 18 व्यक्ती जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीस बाहेर काढण्यात यश आले आहे.

बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) दोन पथके दाखल झाली असून, या पथकांना पुणे व पिंपरी-चिंचवडमधील आपदा मित्र आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (PMRDA) अग्निशमन दल व स्थानिक बचाव संस्था मदत करत आहेत. सध्या घटनास्थळी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, पोलीस दल आणि स्थानिक प्रशासन उपस्थित आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.