Order for inquiry by senior deputy collector:- नागरिकांना अवमानास्पद वागणूक देणारे वरिष्ठ उपजिल्हाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात!
महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना आदेश

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २५ जून २०२५ :- कोणतंही सरकारी कार्यालय म्हटलं की, भोळ्याभाबड्या नागरिकांना कोणत्या ना कोणत्या तरी कामानिमित्त सरकारी कार्यालयात जावेच लागते. कामानिमित्ताने सरकारी कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना मोठा मनःस्तापही सोसावा लागतो आणि कधी कधी एकाद्या तिरसट अधिकाऱ्याकडून अवमानकारक वागणूकही मिळत असते. पण अनेकदा काही अधिकारी हे आपण सरकारी नोकर असलो तरी जनतेचे सेवक असतो, हेच विसरून जातात. यातूनच काही अधिकारी चक्क सरकारी कार्यालयात उर्मटपणे वागत असतात.अशीच घटना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांकडून घडली आणि ज्या व्यक्तीला अवमानकारक वागणूक मिळाली त्या व्यक्तीने चक्क राज्याच्या महसूल मंत्र्याकडेच लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत, संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिला आहे. या आदेशामुळे संबंधित उपजिल्हाधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या आदेशाने बावनकुळे यांनी राज्यातील महसूल विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये मग ते विभागीय आयुक्त कार्यालय असो, जिल्हा कार्यालय असो की तहसील कार्यालय असो, या कार्यालयांमध्ये सर्वसामान्य माणसाला सन्मानजनक वागणूक मिळाली पाहिजे, हाच संदेश दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात मे महिन्यात एका नागरिकाला अवमानकारक वागणूक देण्याची घटना घडली होती. संबंधित नागरिकाने तत्काळ ही बाब महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कानावर घातली आणि या अधिकाऱ्याच्या विरोधात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली होती. अधिकाऱ्यांकडून सामान्यजनांना मिळणारी वागणूक ही सर्वांना माहितच आहे. अशाच एका खासगी कामासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्यालाही अधिकाऱ्याच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले होते.
ही घटना पुण्यातील रॉयल ग्रुपचे संचालक प्रफुल कोठारी यांच्याबाबतीत घडली होती. कोठारी हे त्यांच्या खासगी कामासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कामासाठी एका वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता.परंतु आपण लोकसेवक आहोत,ही जाणीव न ठेवता संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोठारी यांना अवमानास्पद वागणूक दिली होती. एकाच कामासाठी सारखे सारखे पन्नास वेळा येऊ नका, इथं परत यायचं नाही, अशा शब्दांत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोठारी यांना चारचौघांत अवमानित केले होते.या घटनेमुळे संतप्त झालेल्या कोठारी यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली होती.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नसली तरीसुद्धा कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाते, हाच मोठा दिलासा असल्याचे तक्रारदार प्रफुल्ल कोठारी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. एका चंद्रशेखर बावनकुळे यांची कार्यकर्त्यांप्रति इतकी संवेदनशीलता खरोखरीच कौतुकास्पद आहे.
या प्रकरणाविषयी मी फक्त एक मेसेज केलेला होता. परंतु त्याची तत्काळ दखल घेतली गेली आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याविषयी त्यांनी आदेश दिले. हा आदेश माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सामान्य जनतेला कशीही वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांनीही यातून धडा घेऊन आपण लोकांना प्रतिसाद द्यायला हवा, हे शिकले पाहिजे.
- प्रफुल्ल कोठारी, तक्रारदार