Pune ZP's Sevak Sahakari Patsanstha wins 'hattrick' in awards : पुणे झेडपीच्या कर्मचाऱ्यांनी उंचावली पतसंस्थेची 'पत'; सेवक सहकारी पतसंस्थेची पुरस्कारांत 'हॅटट्रिक'!
जिल्हा बॅंकेची कायमस्वरूपी ढाल अन् नागरी पतसंस्था सहकारी फेडरेशनचा पटकावला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ ऑक्टोबर २०२५ :- पुणे जिल्हा परिषदेच्या (झेडपी) सेवकांच्या सहकारी पतसंस्थेने यंदा पुरस्कारांची हॅटट्रिक केली आहे. या पतसंस्थेंच्या हिरकमहोत्सवानंतरच्या पहिल्याच वर्षात पतसंस्थेने ही कामगिरी केली आहे. यंदा या पतसंस्थेंला उत्कृष्ट कामगिरीबाबतची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (पीडीसीसी) कायमस्वरूपी ढाल आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांच्या सहकारी फेडरेशननच्या वतीने पगारदार नोकर पतसंस्थांसाठी दिला जाणारा प्रथम क्रमांकाचा दिवंगत माजी आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार पटकावला आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था असून या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयातील दैनंदिन कामकाज सांभाळत आपल्या पतसंस्थेंची 'पत' उंचावण्याची ही किमया केली आहे.
विशेष म्हणजे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या राज्याचे कृषिमंत्री असलेले दत्तात्रेय भरणे यांच्याच हस्ते जिल्हा बॅंकेची कायमस्वरूपी ढाल मिळाल्याने झेडपी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब ठरली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश नांदखिले, उपाध्यक्ष राजेश आवटे, सचिव सुरेंद्र सौदागर यांच्यासह सर्व संचालक मंडळाने हे दोन्ही पुरस्कार स्विकारले आहेत. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी (सन २०२४) या पतसंस्थेने आपला हिरकमहोत्सव साजरा केला आहे.
महाराष्ट्रात सन १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली. यानुसार पुणे जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी जिल्हा परिषदेतील तत्कालीन कर्मचाऱ्यांनी एकत्र येत, दि. ३१ जुलै १९६४ रोजी पुणे जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेंची स्थापना केली आहे. गेल्या १५ वर्षांत आवर्तक ठेव वगळता संस्थेच्या काटकसर निधी, कुटूंब संरक्षण योजना, कर्ज वाटप, कर्जावरील व्याज, राखीव निधी, राखीव निधी गुंतवणूक, खेळते भांडवल आणि निव्वळ नफा या सर्वच बाबींमध्ये मोठी वाढ करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे.
दरम्यान, सरत्या आर्थिक वर्षात (सन २०२४-२५) १ कोटी ६४ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून आतापर्यंत एकूण नफा ८ कोटी ९१ लाख रुपये इतका झाला आहे. सध्या पतसंस्थांचे अधिकृत भागभांडवल १०० कोटी रुपये इतके असून खेळते भागभांडवल १३७ कोटी ७८ लाख रुपये इतके झाले आहे. सभासदांना विविध कामांसाठी १११ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश नांदखिले यांनी सांगितले.
सरत्या आर्थिक वर्षातील कामगिरीतील वाढ (टक्केवारीत)
- सभासद संख्या --- ५.५७ टक्के.
- भागभांडवल --- २.०४ टक्के.
- आवर्त ठेव --- ९.९६ टक्के.
- राखीव निधी --- २.१८ टक्के.
- कुटूंब संरक्षण योजना निधी --- ३.३१ टक्के.
- काटकसर निधी --- १४.५० टक्के.
- कर्ज वाटप --- १७.४६ टक्के.
- कर्जावरील व्याजाचे उत्पन्न --- १९.०८ टक्के.
- सभासद आपत्कालीन मदत निधी --- १२.४३ टक्के.
- सभासद मृत्यूफंड / कर्जमाफी निधी --- १८२.४९ टक्के.
- महोत्सव निधी --- ३४३.५८ टक्के.
- खेळते भांडवल --- १५.८१
या पुरस्कारांमुळे आम्ही केलेल्या आतापर्यंतच्या यशस्वी कामावर शिक्कामोर्तब केले आहे. यातून आम्हाला यापुढे आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. कारण यामुळे आम्हा सर्व संचालक मंडळाचा आणि कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हे दोन्ही पुरस्कार म्हणजे संचालक मंडळ आणि सर्व सभासदांनी केलेल्या कामाचे फळ आहे.
- योगेश नांदखिले
अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था
