पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक प्रशासन अधिक गतिमान होणार!
पुणे झेडपीचे माजी जालिंदर कामठे यांचे मत : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे डॉ. मोरे यांचा खास सन्मान

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २७ जून २०२५ :- पुणे विभागाचे नवनियुक्त शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. या योगदानाची दखल घेऊन राज्य सरकारने डॉ. मोरे यांची शिक्षण उपसंचालकपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे पुणे विभागातील शैक्षणिक प्रशासन अधिक गतिमान होईल आणि शाळांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजप नेते जालिंदर कामठे यांनी येथे बोलताना व्यक्त केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांची नुकतीच पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या समारंभात वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या हस्ते डॉ. गणपत मोरे यांचा पुष्पगुच्छ, शाल, व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जालिंदर कामठे म्हणाले, "नवनियुक्त शिक्षण उपसंचालक डॉ. मोरे यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे हे योगदान, कार्यकौशल्य आणि दूरदृष्टी यांची दखल घेत, राज्य सरकारने ही नियुक्ती केली आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांना शून्य शिक्षक संख्या मिळाली आहे."
पुणे जिल्हास्तरावर उच्च माध्यमिक विभागात काही शाळांमधील शिक्षकांच्या पूर्ण वेळ व अर्धवेळ प्राध्यापकांच्या मान्यता मिळालेल्या नाहीत. शालार्थ आयडी प्रक्रिया पूर्ण होण्यास खुप उशीर होत आहे . विद्यार्थी संख्या वाढ झालेल्या शाळांना शिक्षक वाढ मिळत नाही. सध्या अनेक शाळांमध्ये लेखनिक नाहीत.ही भरती प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती.पण त्यावर स्थगिती आली आहे. ती त्वरित उठवावी आदी विविध प्रश्नांकडे डॉ. मोरे हे व्यक्तीगत लक्ष देतील, अशी अपेक्षा जालिंदर कामठे यांनी यावेळी व्यक्त केली.
पुणे विभागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शिक्षकांचे सक्षमीकरण व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे माझे प्राथमिक उद्दिष्ट असेल. शिवाय शाळांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील,असे आश्वासन डॉ. मोरे यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. ज्योती परिहार, प्राचार्य भानुदास रिठे,जमिल नल्लामंदू आदी उपस्थित होते.