पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर फरकापोटी साडेसहा कोटी रूपयांचा लाभ!

प्रत्येक शेतकऱ्याला प्रति लिटर १ रुपायांप्रमाणे फरकाची रक्कम अदा : मार्च महिन्याच्या दूध बिलात थेट बँक खात्यात फरक जमा

पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर फरकापोटी साडेसहा कोटी रूपयांचा लाभ!
पुणे :- कात्रज डेअरी

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २२ एप्रिल २०२५ :-  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने (कात्रज डेअरी) जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दर फरकापोटी ६ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम मार्च महिन्यातील दूध देयकांबरोबर वितरित करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला प्रति लिटर १ रूपयांप्रमाणे या  दूध दर फरकाची रक्कम वाटप करण्यात आली आहे. ही रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. याचा जिल्ह्यातील लाभ ८५६ दूध संस्थांना आणि या संस्थांमध्ये दूध विक्री करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना मिळाला असल्याचे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितले. 

जिल्हा दूध संघाने (कात्रज डेअरी) मागील आर्थिक वर्षात  दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर रु.२ रुपयांप्रमाणे दर देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार या दर फरकाची रक्कम दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्याचे निश्चित करण्यात आले होते. या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील दूध दर फरकाची प्रति लिटर १ रुपयांप्रमाणे ऑक्टोबर  २०२४ मध्ये वितरित करण्यात आली होती. यानुसार पहिल्या टप्प्यात एकूण ६ कोटी ४३ लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली होती. यावेळी ८५५ दूध संस्थांना आणि त्यांच्याकडे दूध विक्री करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना झाला होता. 

यासंदर्भात माहिती देताना दूध संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे म्हणाले, "दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जपणे हे जिल्हा दूध संघाचे पहिले कर्तव्य आहे. दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ नफा नव्हे, तर शेतकऱ्यांचा विकास आणि त्यांचे सक्षमीकरण हे खरे ध्येय आहे."

जिल्हा दूध संघाच्या भविष्यातील विशेष योजना

- दूध संकलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाधा वापर करणार 

- शीतसाखळी (Cold Chain) अधिक मजबूत करणे.

- पशुखाद्य व खते यामध्ये शेतकऱ्यांना सबसिडीची सुविधा वाढविणे.

- गुणवतेवर भर देऊन 'कात्रज ब्रॅंड' अधिक बळकट करणे.

- नविन दुग्धजन्य उत्पादने व आयुर्वेदिक दूध उत्पादने बाजारात आणणे.

- महिला व युवा शेतकऱ्यांना प्रशिक्षण व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.


कात्रज दूध संघ ही केवळ एक संस्था नसून, ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांचे स्वप्न आणि आधार आहे. भविष्यातही दूध संघ अधिक व्यापक पातळीवर काम करून राज्यात एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला येईल. 

-अॅड. स्वप्नील ढमढेरे, अध्यक्ष, जिल्हा दूध संघ.