परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनो, गणवेश वापरा,अन्यथा कारवाईला सामोरे जा!
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांचा इशारा : पांढरा शर्ट, खाकी पँट परिधान करणे अनिवार्य

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २३ एप्रिल २०२५ :- तुम्ही परवानाधारक ऑटोरिक्षा चालक किंवा टॅक्सीचालक आहात. या प्रश्नाचे उत्तर होय असेल तर, तुम्हाला गणवेश वापरावाच लागेल. गणवेशातून तुमची सुटका नाही, असे स्पष्ट करत ऑटोरिक्षा चालक आणि टॅक्सीचालकांनो, तुम्हाला गणवेश घालावाच लागेल, असा आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिला आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भोसले यांनी दिला आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ नुसार परवानाधारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवसाय करत असतांना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट) व खाकी रंगाची पँट’ असा गणवेश परिधान करणे आणि गळ्यात ओळखपत्र घालणे अनिवार्य आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑटोरिक्षा व टॅक्सींची तपासणी करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांच्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाच्या कामकाजासह मोटर तपासणीचे कामकाज तपासण्यात येणार आहे.
यासाठी सर्व ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारक वाहनचालकांनी आपापल्या वाहनांची वैध कागदपत्रे सोबत बाळगावीत.अन्यथा तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायदा व प्राधिकरणाने विहित केलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा भोसले यांनी दिला आहे.