वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तब्बल ११४ सुवर्णपदक पटकावणारी पुण्यातील चिमुकली स्केटिंगपट्टू, गिनीज बुकमध्ये नोंद 

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील मनस्वी पिंपरे हिचा  विक्रम : खासदार सुप्रिया सुळेंकडून गौरव 

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी तब्बल ११४ सुवर्णपदक पटकावणारी पुण्यातील चिमुकली स्केटिंगपट्टू, गिनीज बुकमध्ये नोंद 
पुणे :- सात वर्षीय स्केटिंगपट्टू मनस्वी पिंपळे हिचा गौरव करताना खासदार सुप्रिया सुळे. यावेळी मनस्वीचे प्रशिक्षक व पालक.

ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १० मे २०२५ :- वय अवघं ७ वर्ष. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनची स्केटिंग या खेळाचे धडे गिरविण्यास सुरुवात. तेव्हापासून आजतागायतच्या फक्त चार वर्षांच्या कालावधीत या खेळात उत्कृष्ट कामगिरीबाबतचे तब्बल ११४ सुवर्णपदक, १६ रजत आणि १४ ब्रॉंझ पदके पटकावत या चिमुकलीने जागतिक विक्रम केला आहे.

इतक्या लहान वयात शंभराहूध अधिक सुवर्ण पदकासह अनेक पदकांवर आपले नाव कोरले आहे. या विक्रमाबद्दल तिचे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदले गेले आहे. ही किमया करणाऱ्या चिमुकलीचे नाव मनस्वी विशाल पिंपरे असे आहे. ती पुणे शहरातील कोंढवा बुद्रुक येथील रहिवासी आहे. 

दरम्यान, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर असलेल्या मनस्वीचा  खासदार सुप्रिया सुळे यांनी गौरव केला आहे. सुळे यांनी मनस्वीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत तिला पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दीड लाख रुपये किंमतीचे स्केटिंग किट भेट दिले आहे. मनस्वी हिने शुक्रवारी (दि.९ मे) पालकासह खासदार सुळे यांची भेट घेतली. तिने स्केटिंगमध्ये अनेक जागतिक किर्तीचे विक्रम केले आहेत. ती सर्वात लहान गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड होल्डर आहे. आत्तापर्यंत तिने वेगवेगळ्या स्केटिंग स्पर्धांत तब्बल ११४ सुवर्ण पदक, १६ रजत आणि १४ ब्राँझ पदके पटकावली आहेत. याशिवाय ती नॅशनल स्केटिंग चॅम्पियन देखील आहे. मनस्वीला आतापर्यंत हिंदरत्न या पुरस्कारासह १७ विविध पुरस्कार मिळाले आहेत. 

मनस्वी हिने नुकतेच सलग ३० किलोमीटर स्केटिंग करत अनोखा विक्रम प्रस्थापित केला असून युवा पिढीला खेळाचा सकारात्मक संदेश दिला आहे. मनस्वीला २०२६ साली राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक जिंकायचे आहे. यासाठी ती प्रशिक्षक विजय मलजी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

याशिवाय तिला एशियन गेम्स, ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. तिच्या या स्वप्नांना बळ देण्यासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने खासदार सुळे यांच्या हस्ते इनलाईन स्केट किट भेट देण्यात आले. आजवरच्या तिच्या कामगिरीबद्दल मनस्वी हिचे पालक आणि प्रशिक्षक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस खासदार सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.