ZP Teachers Training Programme :- महाराष्ट्रातील शिक्षकांचे येत्या सोमवारपासून (दि.२ जून) एकाचवेळी होणार तालुकास्तरीय वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण!
तालुकास्तरावर आयोजन : राष्ट्रीय शिक्षण धोरण, अभ्यासक्रम आराखड्याचा प्रशिक्षणात समावेश

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ जून २०२५ :- पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने येत्या सोमवारपासून (दि.२ जून) तालुका स्तरावर वरिष्ठ आणि निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण राज्यात एकाचवेळी आयोजित करण्यात आले असून ते दि..०२ ते १२ जून या कालावधीत संपन्न होणार आहे.
दरम्यान,या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण २ हजार ४९३ प्रशिक्षणार्थी असणार आहेत.हे प्रशिक्षण दररोज सकाळी ९.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संपन्न होणार आहे. पुणे जिल्ह्यातील हे प्रशिक्षण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार असून फक्त मुळशी व वेल्हे तालुक्याचे एकत्रित प्रशिक्षण इंग्लिश स्कूल बावधन येथे तर, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षकांचे एकत्रित प्रशिक्षण मॉडर्न कॉलेज पुणे येथे होणार आहे.
या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, शाळा मूल्यांकन,आश्वासन आराखडा,शिक्षण हक्क कायदा,ऑनलाइन शिक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यस्तरीय प्रशिक्षण दि.२६ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत पुण्यातील एससीईआरटी व जिल्हास्तरीय प्रशिक्षण दि. २६ मे ते २९ मे या कालावधीत पुण्यातील विमलाबाई गरवारे माध्यमिक विद्यालयात पार पडले. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षणातील तज्ज्ञ मार्गदर्शक हे तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रशिक्षणार्थी शिक्षक संख्या
( तालुका, वरिष्ठ व निवड श्रेणी संख्या या क्रमाने)
- आंबेगाव --- २३--- ३९
- जुन्नर --- ५९ --- ५८
- खेड --- ९२ --- ६१
- मावळ --- ५८ --- ४८
- मुळशी --- ३६ --- १८
- भोर --- २९ --- ३८
- वेल्हे --- ०९ --- १२
- शिरूर --- ६८--- ६६
- हवेली ---२७७ ---१३९
- दौंड --- ६० --- ३८
- पुरंदर --- ४१ ---४८
- इंदापूर ---१०५ ---६९
- बारामती--- ९० --- ७६
- एकूण (ग्रामीण) --- ९४७ -- ७१०
- पुणे शहर --- ४८६ --- निरंक
- पिंपरी चिंचवड शहर --- निरंक ---- ३५१
- एकूण (ग्रामीण व शहर मिळून) --- १४३३ --- १०६१
आपापल्या सेवेची बारा वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी तर, चोवीस वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डाएट ) या संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. शिक्षकांना या प्रशिक्षणाचा निश्चितच फायदा होईल.
- दत्तात्रेय जानकु वाळुंज,
माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ.