राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे काळाच्या पडद्याआड, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन!
नवी मुंबईत मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येणार : दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार होणार

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १५ एप्रिल २०२५ :- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व विद्यमान मुख्य सल्लागार ग.दि.कुलथे यांचे सोमवारी (दि. १४ एप्रिल) रात्री नऊ वाजता नवी मुंबईतील नेरूळ येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या स्थापनेबरोबरच या महासंघाच्या उभारणीत आणि वाटचालीतही त्यांचा सिंहाचा वाटा होता. मागील पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी राजपत्रित अधिकारी महासंघात विविध पदांवर काम केले. गेली पाच दशकांपासून राजपत्रित महासंघ म्हटले की ग. दि. कुलथे आणि ग. दि. कुलथे म्हटले की राजपत्रित असं एक अनोखे समिकरणचं बनले होते. त्यामुळे कुलथे यांच्या निधनामुळे राजपत्रित अधिकारी महासंघाचे मोठे नुकसान झाल्याची भावना राज्यभरातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. राज्य सरकारच्या विविध सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. सध्या ते या महासंघाच्या मुख्य सल्लागारपदी कार्यरत होते.
राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता यावे, यासाठी त्यांचे पार्थिव मंगळवारी (दि. १५ एप्रिल) सकाळी नऊ दुपारी साडेबारा वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
त्यांच्या निवासाचा पत्ता हा बुनियाद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, २ रा मजला, सेक्टर १५, नेरूळ ं(पूर्व ),नवी मुंबई, असा आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर नवी मुंबईतील येथील नेरूळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने ग. दि.कुलथे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.