दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अकराव्या पुण्यतिथीनिमित्त लाखो अनुयायांनी केले विनम्र अभिवादन! 

अकराव्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड येथे लोटला जनसागर : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंसह कुटुंबियांची उपस्थिती 

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अकराव्या पुण्यतिथीनिमित्त लाखो अनुयायांनी केले विनम्र अभिवादन! 
परळी :- बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड येथे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त जमलेला जनसमुदाय
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अकराव्या पुण्यतिथीनिमित्त लाखो अनुयायांनी केले विनम्र अभिवादन! 

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. ३ जून २०२५ :-  माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. ३ जून) गोपीनाथ मुंडे यांना लाखो अनुयायांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी दिवंगत मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, मुंडे यांच्या ज्येष्ठ कन्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे आदींसह मुंडे आणि महाजन कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. 

दिवंगत मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील गोपीनाथगड येथे ज्येष्ठ किर्तनकार रामराव ढोक महाराज यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. किर्तन सुरू होण्यापुर्वी मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे आदींसह कुटुंबातील सर्व सदस्यांनी मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. 

दिवंगत गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य या पदापासून केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री पदापर्यंत पोहोचलेले महाराष्ट्रातील एकमेव नेते होते. दरम्यान मुंडे यांनी तत्पुर्वी तत्कालीन रेणापूर आणि सध्याच्या परळी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आणि त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त, ऊर्जा आणि गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री आदी विविध पदांवर काम करत आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. 

सन २००९ आणि २०१४ मध्ये ते लोकसभेवर निवडून आले होते. सन २०१४ मध्ये लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, दि. ३ जून २०१४ रोजी त्यांचे नवी दिल्ली येथे एका मोटार अपघातात निधन झाले. तेव्हापासून दरवर्षी ३ जून रोजी गोपीनाथगड येथे दिवंगत मुंडे यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.