यंदाच्या ऊस गळीत हंगामात सरासरी साखर उतारा घटला,ऊस दराला फटका बसणार?
राज्यातील सरासरी साखर उताऱ्यात ०.७७ टक्क्यांनी घट : ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याचा धोका

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० एप्रिल २०२५ :- महाराष्ट्रातील यंदाच्या ऊस गळीत हंगामात (सन २०२४-२५) सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या सरासरी उताऱ्यात ०.७७ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाच्या गळीत हंगामातील सरासरी साखर उतारा हा केवळ ९.४८ टक्के इतका आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेपर्यंत हाच सरासरी साखर उतारा हा १०.२५ टक्के होता. याचा ऊसाच्या दरावर नकारात्मक परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उसाचा किमान आधारभूत दर हा साखरेच्या उताऱ्यानुसार निश्चित होत असतो. यामुळे जेवढा जास्त साखर उतारा तेवढा जास्त प्रति टन ऊसाचा दर असतो. तसेच हा साखर उतारा कमी झाला की, ऊसाचे प्रतिटन दरही कमी होत असतात,ही वस्तुस्थिती आहे. यामुळे यंदा केवळ साखर उतारा सर्वाधिक असलेल्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच उसाला चांगला दर मिळू शकणार आहे.
राज्यात सर्वाधिक ११.८ टक्के इतका सरासरी साखर उतारा हा कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा तर, सर्वांत कमी म्हणजे केवळ ५.१२ टक्के साखर उतारा नागपूर विभागातील कारखान्यांचा आहे. त्यामुळे यंदा फक्त कोल्हापूर विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळू शकणार आहे. राज्यातील सरासरी साखर उताऱ्याच्या टक्केवारीत नांदेड विभाग दुसऱ्या तर, पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वृत्तास राज्याच्या साखर आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
साखर कारखान्यांचे राज्यात एकूण आठ विभाग असून, यामध्ये कोल्हापूर,पुणे, सोलापूर,अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती आणि नागपूर या विभागांचा समावेश आहे. सर्व विभागातील मिळून २०० साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरु केला होता. यापैकी १९९ साखर कारखाने आतापर्यंत बंद झाले असून, सध्या केवळ एकच साखर कारखाना चालू आहे.
विभागनिहाय सरासरी साखर उतारा टक्केवारीत (कंसात गेल्या वर्षीचा साखर उतारा)
- कोल्हापूर --- ११.०८ (११.५ ) टक्के
- पुणे --- ९.६५ (१०.४)
- सोलापूर --- ८.१३ (९.३४)
- अहिल्यानगर --- ८.९३ (९.८७)
- छत्रपती संभाजीनगर --- ८.०३ (८.८७)
- नांदेड --- ९.६७ (१०.१७)
- अमरावती --- ८.९७ (९.३)
- नागपूर --- ५.१२ (५.८१)