पुणे जिल्हा परिषदेत भरणार पंचायतराजदिनी माजी पदाधिकारी व सदस्यांचे स्नेहसंमेलन
स्नेहसंमेलनात पंचायतराजच्या वाटचालीवर चर्चेचे आयोजन : झेडपीतील निवृत्त अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करणार

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २० एप्रिल २०२५ :- राष्ट्रीय पंचायतराजदिनी म्हणजेच येत्या २४ एप्रिल पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सर्व माजी सदस्यांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. यासाठी पंचायतराजदिनी माजी सदस्यांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाला जिल्हा परिषदेच्या निवृत्त अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या आयोजनासाठी खास संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर असलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात २४ एप्रिलला दुपारी १२ वाजता स्नेहसंमेलन सुरू होणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व माजी पदाधिकारी आणि सदस्य यांना निमंत्रित करण्यात आल्याचे संयोजन समितीचे समन्वयक शरद बुट्टे पाटील यांनी सांगितले.
या स्नेहसंमेलनात पंचायतराज संस्थांच्या (जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती) वाटचालीबद्दल चर्चा केली जाणार आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधी मनोगत व्यक्त करणार आहेत. जिल्हा परिषद मुख्यालयाच्या परिसरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या संमेलनाला सुरुवात होणार आहे.यानिमित्ताने मागील २५ ते ३० वर्षातील अनेक पदाधिकारी आणि सदस्य पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर मागील सलग तीन वर्षांपासून प्रशासकराज असल्याने लोकप्रतिनिधींचा संपर्क कमी झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींमधील संवादसुद्धा कमी झाला आहे. हा संवाद घडवून आणणे, हा स्नेहसंमेलनाचा मुख्य हेतू आहे.
महाराष्ट्रातील 'पंचायतराज'चे जनक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सर्वांगीण विकासासाठी जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकवट्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळेच विविध अनुभव आणि भूमिका असलेल्या लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि अनुभव घेऊन या संस्थांचा कारभार अधिक लोकाभिमुख होत असतो. परंतु गेली तीन वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये लोकप्रतिनिधी
नसल्याने मोठ्या प्रमाणावर या संस्थांचे नुकसान झाले आहे.
या स्नेहसंमेलनात पंचायतराजमधील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली जाणार असून, या चर्चेतून अनेक चांगल्या सूचना पुढे येऊ शकतात. या सर्व सूचना एकत्र करून प्रशासनाला दिल्या जाणार आहेत.यादृष्टीने हे संमेलन महत्त्वाचे आहे.
त्यामुळे या संमेलनासाठी सर्व माजी लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलनाला येणार सर्वसाधारण सभेचा 'लूक'
पुणे जिल्हा परिषदेतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृह हे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे सभागृह आहे. त्यामुळे जसे राज्य दोन्ही सभागृहात त्या त्या सभागृहाच्या सदस्यांशिवाय अन्य कोणालाही सभागृहात प्रवेश करता येत नाही. अगदी विधिमंडळातील सभागृहांप्रमाणे यशवंतराव चव्हाण सभागृहातसुद्धा झेडपी सदस्य आणि सभागृह कामकाजाशी अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश मिळत नाही. पण याला पंचायतराजदिनी होणारे माजी सदस्यांचे स्नेहसंमेलन अपवाद ठरणार आहे. कारण नेहमी फक्त विद्यमान सदस्यांना प्रवेश मिळणाऱ्या या सभागृहात पहिल्यांदाच माजी सदस्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे या स्नेहसंमेलनाला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा 'लूक' येणार आहे.