Pune ZP's special app for toilet management during Ashadhi wari :- पुणे जिल्हा परिषदेतर्फे वारकऱ्यांसाठीच्या फिरत्या शौचालयांच्या व्यवस्थापनासाठी खास 'टॉयलेट सेवा' ॲप!
आषाढी वारीतील भाविकांना स्वच्छ व सुरक्षित शौचालय सुविधा उपलब्ध होणार : वारीच्या पार्श्वभूमीवर अॅपची खास निर्मिती

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि.१९ जून २०२५ :- जगतगुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्र्वभूमीवर या दोन्ही पालखी सोहळ्याच्या मार्गावर वारकरी व भाविकांना स्वच्छ शौचालयांची सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने फिरत्या शौचालयांचे व्यवस्थापन करण्यासाठी खास मोबाईल अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपचे 'इ - टॉयलेट सेवा असे नामकरण करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा मिळू शकणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून हे अनोखे अॅप निर्माण करण्यात आले आहे. यंदाच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या वतीने वारी मार्गावर विविध ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या फिरत्या शौचालयांची संख्या मोठी असल्याने, त्या सर्वांचे व्यवस्थापन करणे मोठे जिकिरीचे काम झाले होते. मात्र या अॅपमुळे हा प्रश्न आता निकाली निघू शकणार आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १ हजार ८०० आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर १ हजार २०० अशा एकूण ३ हजार फिरत्या शौचालयांची सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त श्री संत सोपान महाराज पालखी मार्गावर 300 शौचालये उभारण्यात आलेली आहेत, अशी माहिती सीईओ गजानन पाटील यांनी दिली .
या ॲपमध्ये शौचालयांची उभारणी व स्थिती, स्वच्छतेची माहिती व नियमित वापर, शौचालयाच्या ठिकाणी असलेली पाणी, वीज व रस्ता आणि साफसफाईची माहिती, शौचालयाचा वापर किती झाला याचा तपशील सहज उपलब्ध होऊ शकणार आहे. शिवाय नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया व सूचना नोंदवण्याची सोयही या अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यासाठी प्रत्येक शौचालयावर क्युआर कोड स्कॅनर लावण्यात आले आहेत. गुगल स्कॅनर वापरून हा क्युआर कोड स्कॅन केल्यास संबंधित शौचालयाची माहिती मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून, भाविकांनी या ॲपचा वापर करून सुविधा व स्वच्छतेबाबत आपली मते नोंदवावीत, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. पुणे जिल्हा परिषदेचा हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत वारकऱ्यांच्या सेवेत एक महत्त्वाची भर घालणार आहे.
या मोबाईल अॅपकरिता खालीलप्रमाणे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
अॅंड्रॉईड मोबाईलसाठी लिंक खालीलप्रमाणे :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.palsak.
ॲपल मोबाईलसाठी लिंक
https://apps.apple.com/in/app/toiletseva/id1557438957