तुम्हाला तुमचं नैराश्य घालवायचं तर, मग हे करा .... अन्यथा हे होईल!
मराठी मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. मोहन निंबाळकर यांचे भाकीत : वेळीच उपचारांची गरज

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ मार्च २०२५ :- माहिती तंत्रज्ञान युगामुळे जीवनशैली बदलली. सध्या समाजातील सर्वच घटकांना सहजासहजी मिळणाऱ्या आधुनिक सुविधांमुळे ही जीवनशैली चांगली वाट आहे. परंतु दुसऱ्या बाजूला माणसांमध्ये मोठ्या वेगाने नैराश्य वाढत आहे. नैराश्यवाढीचे हे प्रमाण असेच कायम राहिल्यास सन २०३० पर्यंत प्रत्येक चारपैकी एक व्यक्ती नैराश्यग्रस्त असेल, अशी भीती मराठी मानसशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. मोहन निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या काळात नैराश्यात गेलेल्या एकूण व्यक्तींपैकी ९० टक्के व्यक्तींना उपचार मिळत नाही. पण यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नैराश्याचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा व्यक्तींना वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. निंबाळकर यांनी दिला आहे.
सायकॉलॉजिकल ट्रेनिंग असोसिएशनच्यावतीने शनिवारी (दि.१५ मार्च) "तणावग्रस्त समाजाला समुपदेशनाची गरज" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात डॉ. निंबाळकर बोलत होते. ते म्हणाले, सध्या नैराश्यग्रस्त व्यक्तींचे प्रमाण हे पाचास एक एवढे आहे. म्हणजेच २०३० पर्यंत नैराश्य (डिप्रेशन) हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा आजार असणार आहे. या आजाराची तीव्रता ओळखून अगोदरच जर खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला तर, भविष्यात गंभीर समस्या उद्भवणार नाहीत. त्यासाठी मानसिक आजारांच्या बाबतीमध्ये प्रथमोपचार म्हणजेच समुपदेशन हे गरजेचे आहे."
समाजातील नैराश्यग्रस्त व्यक्तींचे प्रमाण कमी करण्यासाठी महाविद्यालयांबरोबरच गाव तेथे समुपदेशन केंद्र निर्माण होणे गरजेचे आहे. कारण सध्या घराघरापर्यंत मानसिक आजार येऊन पोहोचलेला आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. भारतातील १८ ते २४ वयोगटातील तरुणांपैकी ५१ टक्के तरुण हे दोन ते तीन वेळा आत्महत्येचा विचार करत असल्याचा निष्कर्ष त्यांनी यावेळी सांगितला.
सायकॉलॉजिकल ट्रेनिंग असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चाबुकस्वार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात समुपदेशनाच्या पायाभूत अभ्यासक्रमाची (कौन्सिलिंग बेसिक कोर्स) सविस्तर माहिती दिली.
मानसिक आजार क्षेत्रातील तज्ज्ञांचे काही निष्कर्ष
- सध्या प्रत्येक एक लाख व्यक्तींमागे केवळ ४ समुपदेशक.
* माणसाची प्रगती होत चाललेली आहे, मात्र मनाचा पराभव होत चाललेला आहे.
* दरवर्षी ५५ लाख लोक हार्ट अटॅकने मरतात. पण त्यांच्या मुळाशी मानसिक समस्या असल्याचे दिसून आलेले आहे.
* भीती, संशय ,अपयश, एकटेपणा, नैराश्य आदी कारणांनी माणूस नैराश्यग्रस्त होत चाललेला आहे.
* मानसिक आजारावर समुपदेशन हाच प्रभावी उपचार आहे.
* नैराश्यग्रस्त व्यक्तींचे वेळीच सममुपदेशन झाले तर, गंभीर आजारांसाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची गरज भासणार नाही.