Yashaswini Award Declared for six women's :- महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सहा महिलांना यशस्विनी पुरस्कार जाहीर, रविवारी पुण्यात पुरस्कारांचे वितरण!
कृषी, साहित्य, क्रीडा, सामाजिक उद्योजकता आणि पत्रकारिता क्षेत्रातील महिलांचा समावेश

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ जून २०२५ :- महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सहा महिलांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशस्वी पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये श्यामला (छत्रपती संभाजीनगर), मनिषा पवार (गडचिरोली), उल्का महाजन (रायगड), अलका धुपकर (मुंबई), कमल कुंभार (धाराशिव) व शबनम शेख (अहिल्यानगर) आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या रविवारी (दि.२२ जून) पुण्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
रोख प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती कळवली असल्याचे पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी सांगितले. या पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक, क्रीडा प्रशिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असलेल्या सहा यशस्विनींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री असताना खासदार शरद पवार यांनी देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात महिला धोरण आणले आणि दि. २२ जून १९९४ रोजी या धोरणाची अंमलबजावणी केली. या घटनेला २८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सन २०२२ पासून यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने राज्यातील कर्तृत्त्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सुरु करण्यात आला आहे. दरम्यान महिला धोरणाला यंदा ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
या पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या महिलांमध्ये स्त्रीकेंद्री आत्मभान जपत मराठी साहित्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या लेखिका श्यामला गरुड,विघ्नहर्ता महिला ग्रामीण विकास संस्था चालवणाऱ्या पर्यावरणस्नेही मनीषा पवार, दलित, आदिवासी, महिला, शेतमजूर, भूमिहीन आदि वंचित व असंघटित श्रमिकांच्या प्रश्नासाठी लढा देणाऱ्या उल्का महाजन, विविध माध्यमातून पत्रकारितेची छाप समाजमनावर उमटवणाऱ्या अलका धुपकर, महिलांना सोबत घेऊन शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या कमल कुंभार आणि कुस्ती या खेळातील निष्णात महिला प्रशिक्षक शबनम शेख या विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा समावेश आहे.
स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे केले आहे.