Membership for Farmers in pacs :- पात्र महिला शेतकऱ्याला सभासदत्व नाकारले, जुन्नरमधील घटना, सेवा सहकारी सोसायटीला सहकार खात्याचा दणका! 

त्वरीत सभासदत्व देण्याचा राजुरी सोसायटीला सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांचा आदेश : डॉ . देशमुखांच्या आदेशाला सोसायटीकडून केराची टोपली 

Membership for Farmers in pacs :- पात्र महिला शेतकऱ्याला सभासदत्व नाकारले, जुन्नरमधील घटना, सेवा सहकारी सोसायटीला सहकार खात्याचा दणका! 
पुणे:- गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयाचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १७ जून २०२५ :-   सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार नियमात बसत असताना पात्र व्यक्तीला संस्थेचे सभासद करण्यास नकार देणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. शिवाय सहकार कायद्यातील तरतुदीनुसार तक्रारदारांना संस्थेचे सभासद करण्याचा आदेश पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) डॉ. गजेंद्र देशमुख यांनी संबंधित सोसायटीला दिला आहे. जुन्नर तालुक्यातील राजुरी सोसायटीत ही घटना घडली आहे. दरम्यान, या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार खात्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून सभासद करण्यास स्पष्ट नकार दिला असल्याचे तक्रारदार जयश्री दिलीप दुरगुडे यांनी सांगितले. 

यासंदर्भात जयश्री दिलीप दुरगुडे यांनी जुन्नरचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर डॉ. देशमुख यांनी तक्रारदार आणि संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला बाजू मांडण्यास सांगितले होते. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर डॉ. देशमुख यांनी मार्च २०२५ मध्ये हा आदेश दिला आहे. हा आदेश देऊनही तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला गेला आहे. मात्र राजुरी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप सदस्यत्व दिले नसून उलट या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप तक्रारदार जयश्री दुरगुडे यांनी केला आहे. 

या सोसायटीचे सभासद होण्यासाठी जयश्री दिलीप दुरगुडे यांनी दि. १५ मे २०२४ रोजी अर्ज केला होता. त्यांनी या अर्जासोबत जमीन क्षेत्राचा ८अ उतारा जोडला होता. या उताऱ्यानुसार गट क्र. ११०३,११११,१५०२ असे ३ गट असून या तीन गटांमध्ये प्रत्येकी तिघांची नावे आहेत. या तीन गटांचे मिळून एकुण क्षेत्र ०.९३ आर इतके आहे. तरीसुद्धा राजुरी सोसायटी सभासद करुन घेत नाही. हे सभासदत्व देण्याबाबत आदेश द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज तक्रारदार जयश्री दुरगुडे यांनी जुन्नरच्या सहाय्यक निबंधकांकडे केला होता. 

दरम्यान, ८ असं च्या उताऱ्यावर असलेल्या क्षेत्रात जयश्री दुरगुडे यांच्या क्षेत्राची आणेवारी  झालेली दिसत नाही. त्यामुळे या एकूण क्षेत्रापैकी दुरगुडे यांचे क्षेत्र किती हे निश्चित होत नाही. याशिवाय या  ८ अ उताऱ्यावरील क्षेत्रातील शंकर गणपत ओटी यांनी खाते क्र.२५३ मधील गट क्र.११०३.११११,१५०२ मध्ये कोणतीही प्रकराची हिस्सेवारी झालेली नसल्याने तक्रारदार जयश्री दुरगुडे यांना सभासद करण्यास दि. २२ मे २०२४ रोजी लेखी हरकत घेतली आहे. तसेच जयश्री दुरगुडे यांच्या सभासदत्वाच्या अर्जाबाबत दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संचालक मंडळाच्या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी जयश्री दिलीप दुरगुडे यांना त्यांच्या मूळगावी म्हणजेच  पिंपरी पेंढार येथील सेवा सहकारी सोसायटीत सभासद होण्यासाठी तोंडी सुचविले होते, अशी बाजू राजुरी सेवा सहकारी सोसायटीने सहाय्यक निबंधकांपुढे मांडली होती. दरम्यान, जयश्री दुरगुडे यांनी यासंदर्भात राजुरी सेवा सहकारी सोसायटीच्या विरोधात सभासद करत नसलेबाबतची तक्रार सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडे दाखल केली होती. 

या तक्रारीच्या चौकशीत तक्रारदार जयश्री दुरगुडे यांची शेतजमीन ही वारसाहक्काने राजूरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या हद्दीत असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या ७/१२ उतारा व फेरफार उताऱ्यावरून  दिसून येते. त्यामुळे संस्थेच्या मंजूर उपविधी क्रमांक ६(३) नुसार कोणत्याही शेतकऱ्याचे किमान १० आर क्षेत्र एखाद्या सेवा सहकारी सोसायटीच्या हद्दीत असल्यास, तो शेतकरी संबंधित संस्थेचा सभासद होण्यास पात्र असतो, असा निष्कर्ष निघाला आहे. ही अट तक्रारदार जयश्री दुरगुडे या पूर्ण करत असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या ७/१२ व ८अ उतारावरुन स्पष्ट होत आहे‌. त्यामुळे जयश्री दुरगुडे या राजुरी सेवा सहकारी सोसायटीच्या सभासद होण्यास पात्र आहेत. त्यामुळे जयश्री दिलीप दुरगुडे यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २३ व मंजूर उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेचे सभासद करून घेण्यात यावा, असा आदेश देत असल्याचे सहाय्यक निबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.