कोंढव्यातील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

भाजपचे नेते जालिंदर कामठे यांच्या हस्ते ध्वजवंदन : हिवरे येथे नीलम गायकवाडचा सन्मान 

कोंढव्यातील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा
पुणे:- हिवरे येथील गुरूवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थीनी नीलम गायकवाड हिचा खास सन्मान करतांना भाजप नेते जालिंदर कामठे व ग्रामस्थ.

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १ मे २०२५ :-  हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथील प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान व शाळेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी नीलम दत्तात्रेय गायकवाड हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल वसंतदादा पाटील प्रतिष्ठान व हिवरे ग्रामस्थ यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

दरम्यान प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालयातील कार्यक्रमात बोलताना जालींदर कामठे म्हणाले, "महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याचा दिवस हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करत असतो. सन १९६० साली भाषावार राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्राची स्थापना झाली होती." 

यावेळी महाराष्ट्राच्या शूरवीरांना, समाजसुधारकांना आणि कार्यकर्त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शिवाय कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भानुदास रिठे, प्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे,‌ मुख्याध्यापिका सुरेखा कोलते, पर्यवेक्षक हेमंत जाधव, विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, नीलम गायकवाड हिचा सन्मान समारंभात बोलताना जालिंदर कामठे म्हणाले , "आजच्या युगामध्ये मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नसून आई-वडिलांचं, गावाचं व देशाचं नाव उज्वल करण्यामध्ये मुलींचा मोठा वाटा आहे. मुली या भविष्यकाळातील भारताचा भक्कम पाया आहेत."

या समारंभाला हिवरे गावच्या सरपंच पुनम कामठे,विजया महाडिक, उपसरपंच रामदास कुदळे, सुदर्शन कुदळे, शब्बीर शेख, नंदू गायकवाड, शांताराम गायकवाड, विनायक लिंभोरे, सचिन लिंभोरे, दत्तात्रेय गायकवाड, मुख्याध्यापिका सुनीता रायडू आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.