पुरंदर तालुक्यातील विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी घेतला शिवकालीन ऐतिहासिक जुन्या शस्त्रांचा अनुभव
गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात भरले होते प्रदर्शन

प्रा. मीरा बडे-सांगळे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ मे २०२५ :- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या हिवरे (ता. पुरंदर) येथील गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालयात पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी शिवकालीन ऐतिहासिक जुन्या शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थांनी शिवकालीन ऐतिहासिक जुन्या शस्त्रांचा अनुभव घेतला.
आपला इतिहास समृद्ध आहे आणि तो पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनाची नितांत गरज आहे.अशा उपक्रमांच्या माध्यमातूनच आपला इतिहास जिवंत राहणार असल्याचे प्रतिपादन वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना केले. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान आणि शिक्षणतज्ज्ञ विजया महाडिक यांच्या संयुक्त विद्यमाने या ऐतिहासिक व शिवकालीन जुन्या शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
हे प्रदर्शन पाहण्यासाठी हिवरे व आजूबाजूच्या गावातील सुमारे एक हजार सहाशेंहून अधिक विद्यार्थी व नागरिक यांनी सहभाग घेतला. हिवरे येथील तरुण मंडळांच्या वतीने प्रदर्शन पाहायला येणाऱ्यांसाठी थंड ताक व सरबताची सोय करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हिवरे गावच्या सरपंच पुनम कामठे, विजया महाडिक उपसरपंच रामदास कुदळे, सुदर्शन कुदळे, शब्बीर शेख, नंदू गायकवाड, शांताराम गायकवाड, विनायक लिंभोरे, सचिन लिंभोरे, विकास चव्हाण आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता रायडू आदी उपस्थित होते.