महाराष्ट्रातील तब्बल ११८८ कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम, एकाच वेळी सर्वाधिक नृत्यांगनांचे कथक नृत्य

लिम्का बुक आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया'त नोंद 

महाराष्ट्रातील तब्बल ११८८ कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम, एकाच वेळी सर्वाधिक नृत्यांगनांचे कथक नृत्य
पुणे:- गेल्या वर्षी पुण्यात झालेल्या सामुदायिक कथ्थक नृत्याचा विश्वविक्रम

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ९ मे २०२५ :- महाराष्ट्रातील विविध २० शहरांमधून आलेल्या १ हजार १८८ कथक नृत्यांगनांनी पुण्यात एकत्र  येत, एकाचवेळी कथक नृत्य सादर केले.यामुळे एक विश्वविक्रम नोंदला गेला आहे. या विश्वविक्रमाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि  'वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया'मध्ये नोंद झाली आहे.

पुण्यातील प्रेरणा फाउंडेशनच्या 'नृत्य चक्र' या नृत्यसमूहाने  या विक्रमाची नोंद केली. ज्योती मनसुखानी यांच्या संकल्पनेतून विविध गटांच्या एकूण १ हजार १८८नृत्यांगनांनी एकत्र येत २० मिनिटांसाठी नृत्य सादरीकरण केले.

संयोजन समितीत  तेजस्विनी साठे, ज्योती मनसुखानी,अस्मिता ठाकूर, रसिका गुमास्ते आणि डॉ. माधुरी आपटे यांचा समावेश होता. कथक नृत्यांगनांनी एकाचवेळी सादर केलेल्या सर्वाधिक रचनांसाठी ही नोंद झाली. गेल्या वर्षी २५ फेब्रुवारी रोजी पुण्यात उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र नोंदीचे प्रमाणपत्र १ मे २०२५ रोजी  मिळाले. शास्त्रीय कथक नृत्य सादरीकरणाचा हा उपक्रम महाराष्ट्रीय  मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर झाला होता.