सरत्या आर्थिक वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे पुणे जिल्ह्यात ३ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा
महसुलात गतवर्षीच्या तुलनेत ९.८५ टक्के वाढ : वर्षभरात ६२१ वाहनांसह २५ कोटी ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ११ एप्रिल २०२५ :- सरत्या आर्थिक वर्षात (सन २०२४-२५) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यात महसूली उत्पन्न, गुन्हे अन्वेषण आणि परवान्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईतून तब्बल २ हजार ९९८ कोटी ३३ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. सन २०२३- २४ आ वर्षाच्या तुलनेत महसुलात २६८ कोटी ८९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत सरत्या आर्थिक वर्षात महसुलात ९.८५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात म्हणजेच गेल्या वर्षी २ हजार ७२९ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता. दरम्यान गेल्या वर्षभरात ६२१ वाहनांसह २५ कोटी ८० लाख रुपयांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क खात्याचे पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी शुक्रवारी (दि.११ एप्रिल) सांगितले.
पुणे जिल्ह्यात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ हजार ९९५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ५ हजार ८९१ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ६२१ वाहनासह २५ कोटी ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अन्वये ५७७ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय २९९ सराईत गुन्हेगारांकडून २ कोटी १८ लाख रुपये रकमेची चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्रे घेण्यात आलेली आहेत. तसेच एमपीडीए कायद्याअंतर्गत दाखल ९ प्रस्ताव दाखल करण्यात आले असून यापैकी १ प्रकरणात सराईत गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असल्याचे राजपूत यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय सन २०२४-२५ वर्षात पुणे जिल्ह्यातील एकूण ५६९ परवानाधारकांविरूद्ध विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी ४ परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.या विभागीय विसंगती प्रकरणात १ कोटी ८६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार धाब्यावर अवैध मद्य विक्री करणाऱ्यांविरुद्ध आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध एकूण ४५५ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये १ हजार २५० आरोपीना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाद्वारे आरोपींना एकुण ८ लाख १९ हजार रुपयांचा दंड ठोठविण्यात आलेला आहे. यामुळे केवळ अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाई न करता त्यासोबत या ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांविरुध्दसुध्दा कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्यांनादेखील चाप बसणार आहे.
नागरिकांनी तक्रार कोठे करावी?
नागरिकांना मद्य वाटपसंबंधी माहिती किंवा तक्रार द्यावयाची असल्यास त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर करावी किंवा व पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाच्या ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व हातभट्टी निर्मिती, वाहतूक, विक्री, धाबे, अवैध ताडी धंदे यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक व परराज्यातील मद्य, अवैध ढाबे, अवैध ताडी, विक्रीविरुद्ध २१ पथकांमार्फत कठोर करण्यात येत आहे.
चरणसिंह राजपूत,
अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
पुणे विभाग, पुणे.