पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुधारणार?

पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची खास तरतूद

पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुधारणार?
मुंबई:- महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधानसभेत प्रवेश करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

ग्रामराज्य न्यूज नेटवर्क 

पुणे, दि. १० मार्च २०२५ :- राज्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर राज्याचे अर्थमंत्री  अजित पवार यांनी विशेष भर दिला आहे. यानुसार पुणे शहरातील मेट्रो विस्तार करणे, पुणे ते शिरूर व पुणे ते तळेगाव या प्रगत महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. 

राज्याचे अर्थमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्याचा सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी (दि.१० मार्च) विधानसभेत सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पात पुणे शहर व जिल्ह्याला काय मिळाले? अशी चर्चा शहर व जिल्ह्यात सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील विकासकामांसाठी करण्यात आलेल्या प्रस्तावित तरतुदींचा आढावा घेतला असता, ही बाब स्पष्ट झाली आहे. यानुसार पुढील वर्षभरात शहरातील मेट्रो चार २३.२ किलोमिटर लांबीचा नवीन मेट्रो मार्ग सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते शिरूर या ५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम करण्यात येणार असून, यासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच तळेगाव ते चाकण या २५ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम केले जाणार आहे. या मार्गाच्या कामासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात  ६ हजार ४९९ कोटी रुपयांची प्रस्तावित तरतूद करण्यात आली आहे.
 
पुणे जिल्ह्याला अर्थसंकल्पात आणखी काय मिळाले? 

* पुणे व  पिंपरी-चिंचवड भागासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशन सुरू करणार
* पुण्यात आयटी आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांसाठी नवीन गुंतवणूक करणार
* पर्यावरण आणि शाश्वत विकासासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणार
*  मोठ्या प्रमाणावर पाण्याचा पुनर्वापर  करण्यासाठीची योजना 
* हरित ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीज दरात बचत करण्यासाठी उपाययोजना.
* पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देणार   
* पुणे जिल्ह्यातील ५०० हून अधिक गावांमध्ये जलसंधारण प्रकल्पांची उभारणी होणार 
* नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा वाढवण्याचे नियोजन करणार