Pune City water supply condition:- पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, मे महिन्यातील पावसामुळे  पाणी कपातीची टांगती तलवार टळली!

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ : 'खडकवासला' प्रकल्पात सव्वा टीएमसी पाणी वाढले

Pune City water supply condition:- पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, मे महिन्यातील पावसामुळे  पाणी कपातीची टांगती तलवार टळली!
पुणे:- पुणे शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर आधारित ए.आय. ने तयार केलेले हे छायाचित्र.

डॉ.गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १३ जून  २०२५ :- पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील पाणीसाठ्यात मे महिन्यातील पावसामुळे सव्वा टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. तसेच पुणेकरांच्या डोक्यावर असलेली पाणी कपातीची टांगती तलवारही आता टळली आहे. 

पुणे शहराला खडकवासला प्रकल्पांतील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या चार धरणांमधील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा हा २९.१५ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांमध्ये सध्या ५.४५ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला या चार धरणांमध्ये मिळून एकूण केवळ ४.२५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यावरून यंदाच्या भर उन्हाळ्यातील म्हणजेच मे महिन्यातील पावसामुळे खडकवासला प्रकल्पांतील धरणांमधील पाणीसाठ्यात सव्वा टीएमसीने वाढ झाली आहे. 

जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी इतके पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी दोन टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी वापरले जात आहे. यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा आता पुणेकरांना आणखी दोन महिने पुरणार आहे. परंतु आता यंदाचा पावसाळा सुरू झाल्याने, या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस वाढच होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील पाणीकपात आता कायमची टळणार आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाण्याची स्थिती  (टीएमसीमध्ये)

- या प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा --- २९.१५ टीएमसी

- सध्या उपलब्ध असलेला साठा --- ५.४५

- शहराला मंजूर पाणी कोटा (वार्षिक) --- १४.६१  टीएमसी

- प्रत्यक्षात वापरले जाणारे पाणी (वार्षिक) --- २०.४९ टीएमसी

- गतवर्षी आजच्या तारखेला उपलब्ध पाणीसाठा --- ४.२५ टीएमसी

खडकवासला प्रकल्पांतील धरणनिहाय शिल्लक पाणीसाठा (कंसात टक्केवारी)

- टेमघर --- ०. १८ टीएमसी (४.८० टक्के)

- वरसगाव --- २.८० (२१.८०टक्के)

- पानशेत --- १.६७ (१५.६७ टक्के)

- खडकवासला --- ०.८१ टीएमसी (४१.०१ टक्के)

- एकूण --- ५.४५ टीएमसी  (१८.७० टक्के)