पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यातील विकासकामे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

वार्षिक आराखड्यातील कामांचा घेतला आढावा : मागील वर्षाच्या प्रलंबित कामांसाठी ५ महिन्यांची डेडलाईन 

पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यातील विकासकामे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 
पुणे:- जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी. बाजूला पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १६ एप्रिल २०२५ :-  पुणे जिल्ह्याच्या मागील आर्थिक वर्षाच्या (सन २०२४-२५) वार्षिक विकास आराखड्यातील सुरू असलेली प्रलंबित कामे ही येत्या ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करा आणि चालू आर्थिक वर्षाच्या (सन २०२५-२६) विकास आराखड्यातील  विकासकामे सुरू करण्यासाठीची मंजुरी प्रक्रिया ३१ मे २०२५ संपवा. याशिवाय चालू आर्थिक वर्षातील सर्व मंजूर कामे ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा, असा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिला आहे. मात्र कामे पूर्ण करताना त्यांची गुणवत्ता चांगली असली पाहिजे, याचीही काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

पुणे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत केल्या जाणाऱ्या सन २०२४-२५ या वर्षीतील कामांचा  आणि सन २०२५-२६ या वर्षांत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी डूडी यांनी घेतला. या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, "मागील आर्थिक वर्षात सर्व यंत्रनांनी नियोजनबद्ध काम केल्यामुळे १०० टक्के खर्चाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील विकिसकामे ही वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी डिसेंबरअखेरपर्यंतची डेडलाईन निश्चित करा आणि यासाठीची मंजुरी प्रक्रिया ही येत्या ३१ मेपर्यंत संपवा. पूर्ण झालेल्या कामांची गुणवत्ता तपासणी पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२६ या तीन महिन्यात केली जाणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत प्रत्येक विभागाने एक प्रस्ताव नियोजन विभागास सादर करावा."

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गजानन पाटील म्हणाले, "जिल्हा परिषदेंअंतर्गत करावयाच्या सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रलंबित कामांची प्रक्रिया ही येत्या ३१ मे २०२५ पूर्ण करावी. जेणेकरून ही कामे तात्काळ पूर्ण करता येतील. या आढावा बैठकीला संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.