महाबोधी महाविहारमुक्तीसाठी लढणाऱ्या अनुयायांना नांदेड सिटीतील उपासकांनी दिला आर्थिक मदतीचा हात!

डॉ. आंबेडकर जयंतीच्या निधीत बचत करत केली आर्थिक मदत : यशवंत मानखेडकर यांचे मदतीचे आवाहन 

महाबोधी महाविहारमुक्तीसाठी लढणाऱ्या अनुयायांना  नांदेड सिटीतील उपासकांनी दिला आर्थिक मदतीचा हात!
पुणे: यशवंत मानखेडकर

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १९ एप्रिल २०२५ :-  बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्ध अनुयायांनी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात देशातीलच नव्हे तर जगभरातील अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मात्र तेथील प्रशासनाने या अनुयायांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे या अनुयायांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे या अनुयायांना सर्वांनी मदतीचा हात देण्याची खरी गरज आहे. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी केला जाणारा अनावश्यक खर्च टाळावा आणि यातून बचत झालेली रक्कम ही धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या अनुयायांना मदत म्हणून द्यावी, असे आवाहन केंद्रीय खेल व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या नेहरू युवा केंद्राचे निवृत्त उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी अनुयायांना केले आहे. 

ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम आणि सर्व बौद्ध संघटनांच्या वतीने हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाबोधी महाविहार मुक्त करून त्याचे नियंत्रण पूर्णपणे बौद्धांच्या हाती सोपविण्यात यावे, सन १९४९ चा टेंपल अॅक्ट रद्द करावा या दोन प्रमुख  मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले आहे. ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे मुख्य सल्लागार भदंत प्रज्ञाशील थेरो आणि सरचिटणीस आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पुणे शहरातील यशवंत मानखेडकर आणि सुधीर मेश्राम या दोन अनुयायांनी बोधगया येथील आंदोलन स्थळाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या अनुयायांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मोठी आर्थिक मदत केली. त्यांनी हा निधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातील खर्चात काटकसर करून  बौद्धगया येथील आंदोलनातील अनुयायांसाठी दिला आहे. पुण्यातील सर्व समर्पित धम्मप्रेमी विचारवंतांचे त्यांच्या सहभागाबद्दल आणि आर्थिक देणगीबद्दल अॉल इंडिया बुद्धिस्ट फोरमने खूप आभार व्यक्त केले आहेत.

नांदेड सिटी'तील नागरिकांचा पुढाकार 

महाविहार बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण भारत आणि विश्वातून उपासक, उपासिका आणि बौद्ध भिक्कू लाखोंच्या संख्येने आंदोलनस्थळी एकत्र आलेले आहेत.परंतू तेथे त्यांची निवास,भोजन आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही. या सर्वांचा विचार करून आशिया खंडातील सर्वांत मोठी सोसायटी असलेल्या नांदेड सिटी सोसायटीतील सदस्यांनी पुढाकार घेत, यासाठी निधी जमा केला आणि तो या आंदोलनांच्या आयोजकांकडे सुपूर्द केला. यासाठी यशवंत मानखेडकर, सुधीर मेश्राम, विजय शिवशरण, डॉ.पल्लवी पानपाटील, मीता भरतकर,सरोज देवरे, अशोक जावळे आणि युवराज सावंत आदींनी पुढाकार घेतला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निधीतून बचत

नांदेड सिटीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करून, या जयंती उत्सवात डी.जे. आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आणि यातून बचत झालेला निधी हा बौद्धगया येथील आंदोलनात सहभागी झालेल्या उपासकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुपूर्द करण्यात आला. यातून आम्ही पिडितांना मदत करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खऱ्या अर्थाने पाईक झालो असल्याचे यशवंत मानखेडकर यांनी म्हटले आहे. 

नांदेड सिटीतील मी स्वतः आणि सुधीर मेश्राम अशा आम्हा दोघांना भगवान बुद्धांच्या आशिर्वादाने महाबौद्ध महाविहारला भेट देण्याचे भाग्य लाभले. आम्ही भाग्यवान आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दानधर्मासाठी झटणारे उपासक व उपासिका आणि हितचिंतकांनी सुरू केलेल्या या आंदोलनाच्या माध्यमातून महाविहार बौद्धगया आंदोलन आणि आपण सर्व मिळून विजय निर्माण करू यात. 

- यशवंत मानखेडकर, निवृत्त उपसंचालक, नेहरू युवा केंद्र.