सामाजिक उपक्रमातून वडिलांनी दिलेली संस्काराची शिदोरी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून वडिलांना वाहिली श्रद्धांजली
भाजप नेते जालिंदर कामठे यांचा अनोखा उपक्रम : वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना १ लाख रुपयांचे शालेय साहित्य वाटप

ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १५ मे २०२५ :- सामाजिक उपक्रमातून वडिलांनी दिलेली संस्काराची शिदोरी सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी वडिलांना आदरांजली वाहिली.समाजसेवेची जाण ठेवत आणि शिक्षणाची कास धरत कामठे यांनी वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना एक लाख रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप केले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण व्हावा, हा उद्देश यामागे कामठे यांनी ठेवला आहे. कामठे यांनी त्यांचे वडील स्वर्गीय सोपानराव सहादू कामठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी (दिनांक १४ मे) पुरंदरतालुक्यातील बोरगावातील सदगुरु कानिफनाथ विद्यालय, माध्यमिक विद्यालय मांढर, माध्यमिक विद्यालय कोथळे, माध्यमिक विद्यालय नारायणपूर व नायगाव
येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना एक लाख रुपयाचे शालेय साहित्य वाटप केले.
वडिलांचा स्मरणदिन सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करून श्रद्धांजली अर्पण करावी व या माध्यमातून सामाजिक घटकांपर्यंत आवश्यक साहित्य पोहोचवावे, अशी भावना जालींदर कामठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत नव्या पिढीला शिक्षणासाठी आवश्यक आधार देणारा आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती पुरस्कार विजेते माजी मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष संदीप देवकर, कुंभारवळनचे माजी सरपंच सचिन पठारे माजी मुख्याध्यापक मनोहर कामठे,उपसरपंच रामदास कुदळे, माजी उपसरपंच धर्माजी गायकवाड, राजेंद्र जाधव शांताराम दळवी,सुदर्शन कुदळे, प्रशांत कदम, सुनिता रायडू,चंद्रशेखर गुरव, संजय शेडगे, रोहिणी गायकवाड, दत्तात्रेय गायकवाड, विकास भोसले, संदीप चाचर, वैशाली पवार,मेघा गायकवाड आणि स्मिता बोराटे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.